
Sangamner Mayor Post : संगमनेर : नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची (Election) रणधुमाळी शिगेला पोहोचत असताना नगराध्यक्ष पदासाठी (Sangamner Mayor Post) अर्ज दाखल प्रक्रियेत मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली. महायुतीच्या वतीने आमदार अमोल खताळ (MLA Amol Khatal) यांच्या वहिनी सुवर्णा संदीप खताळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या राजकारणात चुरस निर्माण केली आहे. तर दुसरीकडे संगमनेर सेवा समितीच्या वतीने डॉ. मैथिली सत्यजीत तांबे (Dr. Maithili Satyajeet Tambe) यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करताच ही लढत थेट ‘दुरंगी’ होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
अवश्य वाचा : अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद; वनविभागाची कारवाई
मुख्य लढत दोन दिग्गज महिलांमध्येच रंगण्याची चिन्हे
नगराध्यक्ष पदासाठी तब्बल १६ महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले असले तरी मुख्य लढत या दोन दिग्गज महिलांमध्येच रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर शहराच्या राजकारणात निर्माण झालेल्या नव्या समीकरणांना या निवडणुकीत कस लागणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी आजवर दाखल झालेल्या अर्जांमध्ये अपक्ष उमेदवारांची मोठी संख्या पाहायला मिळत आहे. मात्र शहरात उमेदवारांची गर्दी, पण चर्चा फक्त दोघींची! अशीच काहीशी परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे…
नक्की वाचा : कारमधून तब्बल एक कोटीची रोकड जप्त; संगमनेरमध्ये मोठी कारवाई
अनेक अपक्ष महीलाही अध्यक्षपदासाठी रिंगनात (Sangamner Mayor Post)
सुवर्णा संदीप खताळ (शिवसेना शिंदे गट – महायुती), डॉ. मैथिली सत्यजीत तांबे (संगमनेर सेवा समिती – ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), सुजाता राजेंद्र देशमुख (भाजपा), रुपाली कपिलेश्वर पवार (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट), तसेच शबाना रईस बेपारी, आलिया सय्यद, तबस्सुम शेख, अंजली तांबे, रुपाती जोंधळे, मेधा भगत यांसारख्या अनेक अपक्ष महिला उमेदवारांनीही नगराध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी दाखल केली आहे.
संगमनेर सेवा समितीच्या वतीने १५ प्रभागांमधील ३० उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागातून दोन उमेदवार असे निवडणूक रचनेनुसार नावे जाहीर झाली असून तांबे यांचा ‘संगमनेर 2.0’ हा विकासाचा व्हिजन या निवडणुकीचा मुख्य मुद्दा ठरणार आहे. सेवा समितीच्या पॅनेलमध्ये अर्चना दिघे, सौरभ कासार, अर्जुना पवार, विश्वास मुर्तडक, वनिता गाडे, मालती डाके, दीपाली पंचारिया, अमजद पठाण, शकीला बेग, सरोजना पगडाल, कविता कतारी, नंदा गरुडकर आदी नावे आहेत.
महायुतीतून सुवर्णा खताळ यांनी उमेदवारी दाखल केली असली तरी महायुतीने अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही. यामुळे शहरातील राजकीय वातावरणात उत्सुकता निर्माण झाली आहे. काही प्रभागांमध्ये अंतर्गत चर्चा सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. संगमनेरची नगराध्यक्षपदाची निवडणूक ही स्त्रीशक्तीच्या दोन प्रमुख चेहऱ्यांमधील प्रतिष्ठेची लढत ठरत आहे. सध्या तरी संगमनेरचे राजकारण तापले असून निवडणुकीचा रंग सर्वत्र चढलेला दिसत आहे.


