नगर : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या जीवनपटाचा वेध घेणाऱ्या ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाची महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या ‘उधळीन मी’ या गाण्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता या चित्रपटातलं ‘मर्दमावळा’ (Murdmavla) हे धडाकेबाज गाणं लाँच करण्यात आलं असून दिव्य कुमार यांच्या दमदार आवाजात हे गीत स्वरबद्ध करण्यात आल आहे. येत्या २६ एप्रिल रोजी “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
नक्की वाचा : ‘हीरामंडी’ मधील ‘तिलस्मी बाहें’ गाणं प्रदर्शित ;सोनाक्षीच्या अदांनी चाहते घायाळ
दिव्यकुमार यांनी गायलं ‘मर्दमावळा’ गाणे (Sangharsh Yodha Movie)
मर्द मावळा या गाण्याला वीरश्री चेतवणारे शब्द, ताल धरायला लावणारे संगीत, भारदास्त आवाज लाभला आहे. दिव्यकुमार यांनी हे गाणं गायलं असून, मंगेश कांगणे यांच्या शब्दांना चिनार महेश यांचं संगीत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर मराठा समाजानं केलेलं अफाट प्रेम, आरक्षणासाठी राज्यभर फिरताना त्यांना मिळालेला तुफान प्रतिसाद, त्यांच्या सभांना झालेली गर्दी या गाण्यात दाखविण्यात आली आहे. या गाण्याचे नेत्रदीपक चित्रीकरणही करण्यात आले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या रांगड्या व्यक्तिमत्त्वासारखंच ‘मर्दमावळा’ हे गाणंही रांगडेपण दर्शवणारं आहे.
हेही पहा : आज गुजरात टायटन्स पंजाब किंग्ससोबत भिडणार;पंजाबच्या फलंदाजांचा लागणार कस
शिवाजी दोलताडे यांनी केले चित्रपटाचे दिग्दर्शन (Sangharsh Yodha Movie)
शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाचे शिवधनुष्य पेललं असून त्यांनी याआधी धुमस, मुसंडी, मजनू आदी चित्रपटांसाठी काम केले आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी तांबे, दत्तात्रय लोहकरे, कार्तिक दोलताडे,नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे.
या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. तर अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही यामध्ये प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी २६ एप्रिलपर्यंत वाट पहावी लागणार आहे.