Sangram Jagtap : नगर : अहिल्यानगर महापालिकेकडून (AMC) पाणीपट्टी दरात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. या दरवाढी विरोधात आज शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी तीव्र विरोध दर्शवित दरवाढीला विरोध केला आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी अहिल्यानगर महापालिका आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांना दिले आहे.
नक्की वाचा : ‘संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना घरात लपवणाऱ्यांचाही हिशोब होणार’-बजरंग सोनवणे
माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
आयुक्त डांगे यांना आमदार संग्राम जगताप यांनी निवेदन दिले. त्यावेळी त्यांच्यासोबत जल अभियंता परिमल निकम, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, बाळासाहेब जगताप, सचिन जगताप, कौशल गायकवाड, सुरेश बनसोडे, कुमार सिंह वाकळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अवश्य वाचा : आधी नियमित पाणी पुरवठा करा, नंतर दरवाढ करावी : अभय आगरकर
निवेदनात म्हटले आहे की, (Sangram Jagtap)
अहिल्यानगर शहरातील नळ धारकांच्या पाणीपट्टी दरात स्थायी समितीच्या माध्यमातून दुप्पट वाढ केल्याचे समजते. ही वाढ सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय जाचक आहे. दरवाढ करताना नागरिकांवर पडणाऱ्या आर्थिक बोजाचा पुरेसा विचार झाल्याचे दिसत नाही. पाणी पुरवठा योजना खर्चिक आहे, हे मान्य असले तरी, नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही याची दक्षता घेतली जाणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर पुनर्विचार करून पाणीपट्टी दरवाढ मर्यादित ठेवावी. तसेच, शहरातील ज्या भागांमध्ये ३-४ दिवसांनी पाणी पुरवठा होतो अथवा अत्यल्प पाणी मिळते. त्या भागांतील नागरिकांसाठी मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. याशिवाय, मीटरद्वारे दिल्या जाणाऱ्या पाण्याचे दर वाजवी ठेवावेत, जेणेकरून नागरिकांना अनावश्यक आर्थिक भार सहन करावा लागणार नाही. तरी या संदर्भात त्वरीत कार्यवाही करून शहरातील नागरिकांच्या पाणीपट्टी दरात केलेली भरसमाट वाढ रद्द करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.