Sangram Jagtap : नगर : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव येथील उर्दू माध्यमातील काही शैक्षणिक संस्थांमध्ये अपहार (Corruption) झाला आहे. शासकीय अधिकारी व संस्था चालकांनी संगमताने करून शासनाचे सुमारे १०० कोटीपेक्षा जास्त निधीची लूट केली आहे. या संबधित शैक्षणिक संस्थांची व शासकीय अधिकाऱ्यांची आर्थिक गुन्हेशाखा व विशेष चौकशी पथक (एस.आय.टी.) मार्फत चौकशी करावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी शुक्रवारी (ता. १८) विधिमंडळाच्या (Legislative Assembly) पावसाळी अधिवेशनात मांडली.
नक्की वाचा : आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
संगनमत करुन काही बनावट कागदपत्रे तयार
यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी आमदार जगताप यांच्या लक्षवेधीला त्वरित उत्तर देत सदर प्रकरणी तातडीने एस.आय.टी. मार्फत चौकशी करून उच्च न्यायालयातही सुरु असलेल्या सुनावणीस सरकार म्हणणे मांडणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले. आमदार जगताप विधिमंडळात लक्षवेधी मांडताना म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील उर्दू माध्यमातील अन्जुमन-ए-तालीम संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा, स्टूडंन्टस वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी संचलित स्वेस हायस्कुल, अन्जुमन-मोईनुत-तुलबा संचलित मालेगाव हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज तसेच सिटीजन वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी संचलित सरदार प्रायमरी स्कुल या शैक्षणिक संस्थांमध्ये नाविद अख्तर व्यक्तीद्वारे तत्कालीन शिक्षक उपसंचालक, शिक्षणाधिकारी, नाशिक जिल्हा परिषदेचे अधीक्षक यांच्याशी संगनमत करुन काही बनावट कागदपत्रे तयार केली.
अवश्य वाचा : जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी; मनोज कोतकर विरोधात गुन्हा
बोगस कारभाराच्या माध्यमातून लूट (Sangram Jagtap)
या बनावट कागदपत्राद्वारे नवीन तुकड्यांची मान्यता मिळवणे, तसेच कर्मचाऱ्यांची मागील तारखेची नेमणुक दाखवून ज्यांनी शाळेत मागील कोणत्याही तारखेस शाळेत सेवाच दिलेली नाही, अशा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती दाखवून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाकडुन प्राप्त करुन घेतले आहे. या बेकायदेशीर कामामध्ये संबंधित शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच लिपीक यांचा सहभाग आहे. या बोगस कारभाराच्या माध्यमातून शासनाची आजतागायत १०० कोटीपेक्षा जास्त निधीची लूट झालेली आहे. त्यानुषंगाने सिटीजन वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी संचलित सरदार प्रायमरी स्कुल च्या संस्थाचालकांच्या विरोधात नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात १० जून रोजी तक्रार दाखल झाली आहे. शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या अपहार करणाऱ्या संबंधित अधिकारी व संस्थांची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत तपास, तसेच एस.आय.टी. स्थापन करून सखोल चौकशी करावी अशी भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी मांडली.