Sangram Jagtap : नगर : शहराच्या स्वच्छतेबाबत ठोस भूमिका घेत आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) गुरुवारी झालेल्या महानगरपालिका बैठकीत चांगलेच संतप्त झाले. बैठकीदरम्यान त्यांनी सर्व स्वच्छता निरीक्षकांची झाडाझडती घेतली तसेच आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांनाही धारेवर धरत शहरातील स्वच्छतेसंदर्भात जाब विचारला. जे स्वच्छता निरीक्षक जबाबदारीने काम करत नाहीत, त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून आठ दिवसांची बिनपगारी सुट्टी देण्याचे आदेश आमदार जगताप यांनी आयुक्तांना दिले.
नक्की वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यात तरतूद नाही
नागरिकांनी ऐकले नाही तर दंडात्मक कारवाई
प्रत्येक स्वच्छता निरीक्षकाने आपल्या विभागातील नागरिकांना स्वच्छतेबाबत सूचना द्याव्यात. जर नागरिक ऐकले नाहीत तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, असेही त्यांनी स्पष्ट केले. जर निरीक्षकांनी आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही, तर मी स्वतः त्यांच्या आणि मनपा अधिकाऱ्यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल करीन, असा इशाराही आमदार जगताप यांनी दिला. महानगरपालिकेमध्ये आयुक्त यशवंत डांगे यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस उपायुक्त संतोष इंगळे, महानगरपालिकेचे शहर अभियंता सुरेश इथापे, अभियंता मनोज पारखे व श्रीकांत निंबाळकर आदींसह सर्व स्वच्छता निरिक्षक उपस्थित होते.
अवश्य वाचा: लाडक्या बहिणींना आता शेवटची संधी, E-KYC ची मुदत काही दिवसातच संपणार
नगर शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – आमदार जगताप यांचे आवाहन (Sangram Jagtap)
आपल्या नगर शहरात कचरा संकलनाचे नव्याने काम सुरू झाले असून, सुमारे ८० कचरा गाड्या कार्यरत झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये. कचरा फक्त कचरा गाडीतच टाकून शहर स्वच्छ ठेवण्यास महानगरपालिकेस सहकार्य करावे. नगर ही आपली जन्मभूमी व कर्मभूमी आहे. शहर स्वच्छ ठेवणे ही जबाबदारी फक्त महापालिकेची नाही, तर प्रत्येक नागरिकाची आहे. त्यामुळे नागरिकांनी बेजबाबदारपणे न वागता आपल्या मातृभूमीला स्वच्छ व सुंदर ठेवावे. देशातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदोर प्रमाणे नगरलाही स्वच्छतेत एक नंबरवर आणायचे आहे. नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न केले, तर हे उद्दिष्ट लवकर पूर्ण होईल. शहरातील स्वच्छतेचे नियम सर्वांनी पाळावेत, असे आवाहन करत त्यांनी चेतावणी दिली की, जे नागरिक रस्त्यावर कचरा टाकतील, त्यांच्यावर महानगरपालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करून आपले नगर शहर स्वच्छ, सुंदर आणि आदर्श ठेवावे.”
आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, नगर शहरात स्वच्छता राहण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. यासाठी नव्याने कचरा संकलनाची एजन्सी नेमण्यात आली आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी रोज सकाळी स्वच्छता करत असतात. मात्र स्वच्छता झाल्यावर नागरिक पुन्हा रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार होत आहेत. अशांवर आता मनपाचे कर्मचारी नजर ठेवणार आहेत. त्यामुळे आपले नगर शहर सतत अस्वच्छ दिसते. त्यामुळे यापुढे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर महानगरपालिका ५०० ते एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करणार आहे. भिस्त्भाग परिसरात काहींवर अशी कारवाई केलीही आहे. नगर शहरात उद्या शुक्रवार सकाळपासून विविध भागांमध्ये डीप क्लीन विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. या कामी नागरिकांनी सहकार्य करावे व आपले नगर शहर स्वच्छ व सुंदर राहील यासाठी सहकार्य करावे.
नगर शहरात शुक्रवारी सकाळी ६ वाजता काटवन खंडोबा चौक, माळीवाडा वेश ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसेच पत्रकार चौकातील भगतसिंग उद्यान या भागांमध्ये डीप क्लीन स्वच्छता अभियन राबवण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त संतोष इंगळे यांनी दिली.



