Sanjay Raut On Ladki Bahin Yojana : ‘आमची सत्ता आली तर आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवू’,असे वक्तव्य करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमदार रवी राणा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. यंदाच्या निवडणुकीत जर तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिलात तर या १५०० रुपयांचे ३००० रुपये होतील. पण जर आशीर्वाद दिला नाही तर मी पण तुमचा भाऊ आहे, हे १५०० रुपये परत घेईन, असे वक्तव्य रवी राणा (Ravi Rana) यांनी केले होते. आता यावरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे.
नक्की वाचा : ‘राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी फडणवीसांच्या विरोधात बोलावं’-रोहित पवार
अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेत अल्प उत्पन्न गटातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. मात्र या योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या योजनेवरून सत्ताधाऱ्यांना डिवचले आहे.
अवश्य वाचा : अंकुश चौधरीने केली’साडे माडे तीन’ची घोषणा;सिक्वेल येणार
‘त्यांच्या लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करतील’ (Sanjay Raut)
संजय राऊत म्हणाले की, रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे, तरीही ते असे बोलतात. सगळे नेते असेच त्यांच्यासारखे बोलत आहेत. पैसे काय यांच्या बापजाद्यांचे आहे का? यांची मानसिकता सरकारी पैशाने वोट विकत घ्यायची आहे. मात्र आमची सत्ता आली तर आम्ही योजनेचे पैसे वाढवू, असे त्यांनी म्हटले आहे. तर, अजित पवार हे स्वतः बारामतीत पराभूत होतील. त्यांच्या लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करतील. सगळे गद्दार आता विधानसभेत दिसणार नाहीत. राज्यातील लाडक्या बहिणी त्यांचा पराभव करतील. आमदारांना ५० कोटी, खासदारांना १०० कोटी तर नगरसेवकांची किंमत ५ कोटी आणि आमच्या लाडक्या बहिणींसाठी १५०० रुपये देता का? तेही मते दिली नाहीत तर पैसे परत घेण्याची भाषा करतात, असा खरपूस समाचार संजय राऊत यांनी घेतला महायुती सरकारचा घेतला आहे.
‘खोके सरकार आम्हाला घालवायचय’ (Sanjay Raut)
विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये न होता नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता असताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील १४ महापालिकेच्या निवडणुका बाकी आहेत, ते निवडणुका घ्यायला घाबरत आहेत. लोकसभा निवडणूक घेतली कारण जगात नाचक्की झाली असती. तारीख मॅनेज करायला ते नक्कीच प्रयत्न करतील. मात्र, त्यांना निवडणूक वेळेवरच घ्यावी लागेल. निवडणूक वेळेवर व्हायलाच पाहिजे. खोके सरकार आम्हाला घालवायचे आहे. महायुतीला लोकसभेचा सर्व्हे अनुकूल नव्हता आता देखील नाही. आम्हाला सर्व्हेची गरज नाही. कोणत्याही परिस्थितीत राज्यात ठाकरे-२ सरकार येणार आहे. म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. हे कोणीही थांबवू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.