Sant Godad Maharaj : कर्जत : कर्जतचे (Karjat) आराध्य दैवत संत श्री सदगुरू गोदड महाराज (Sant Godad Maharaj) यांचा बुधवारी (ता. ३१) कामिका एकादशीला (Kamika Ekadashi) रथोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा होत आहे. यासाठी राज्यातील अनेक भाविक मोठ्या प्रमाणावर धाकट्या पंढरी कर्जतला हजेरी लावणार आहेत. रथोत्सवानिम्मित गोदड महाराज मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
नक्की वाचा : नवाब मलिक यांना कोर्टाचा दिलासा;वेेद्यकीय जामीन मंजूर
रथास नारळाचे तोरण अर्पण करण्याची प्रथा
बुधवारी रात्री १२ वाजल्यानंतर मंदिरात अभिषेकाला सुरुवात केली जाते. त्यानंतर पहाटे पूजा होऊन दर्शनबारीला सुरुवात होते. दुपारी १२.४५ वाजता पंढरीचा राजा श्री पांडुरंग कर्जत येथे प्रत्यक्ष विराजमान होतात, अशी अख्यायिका आहे. मानाचा झेंडा पोलीस प्रशासनाकडून वाजत-गाजत मंदिरात नेला जातो. तर तहसीलदारांच्या हस्ते शासकीय पूजा होऊन मूर्ती रथात विराजमान होऊन रथ ग्राम प्रदक्षिणेसाठी रवाना होतो. भाविक मोठ्या आनंदाने हरिनामाचा जयघोष करीत दोरखंडाच्या साह्याने रथ ओढतात. ठिकठिकाणी संत सदगुरु गोदड महाराज यांच्या रथास नारळाचे तोरण अर्पण केले जाते.
अवश्य वाचा : नगरमध्ये १२ ऑगस्ट रोजी धडकणार मराठ्यांचे वादळ; महाशांतता रॅलीची जय्यत तयारी सुरू
पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त (Sant Godad Maharaj)
रथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (ता.१ ) कुस्त्यांचा हगामा भरविला जाणार असून यासाठी महाराष्ट्रातून नामवंत मल्ल व कुस्तीशौकिन हजेरी लावतात. या रथोत्सवाचे दुसरे आकर्षण म्हणजे मनोरंजनाची मायानगरी. या नगरीत खेळणी, पाळणे, जादूचे प्रयोग, खाऊंची दुकाने यात्रोत्सवाची शोभा वाढवतात. यात्रेच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्या मायानगरीतील लोकांना काही उपद्रवी लोकांकडून त्रास होतो. यासाठी कर्जत पोलिसांनी गोदड महाराज मंदीर आणि मायानगरी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. उपद्रवी लोकांवर कायदेशीर कारवाईचा इशारा पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे आणि पोलीस निरीक्षक मारुती मुलूक यांनी दिला. यासाठी काही पथके तैनात करण्यात आली आहे. रथ यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवला जाणार आहे. रथोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी तालुका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन संत सदगुरू गोदड महाराज यात्रा कमिटी आणि तालुका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.