Satyajit Tambe : संगमनेर : शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी तसेच विविध उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या कंट्रोल रूम आणि सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणेसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीच्या (District Planning Committee) निधीतून संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून अत्याधुनिक आपत्कालीन कंट्रोल रूम उभारण्यात येणार आहे.
नक्की वाचा : आचार्यश्रींच्या पुण्यस्मृतीनिमित्त आनंदधाम येथे भगवान महावीर व्याख्यानमालेचे आयोजन
संगमनेरातही आता कंट्रोल रूम
शहरात होणाऱ्या चुकीच्या घटना, गुन्ह्यांचा शोध, ट्रॅफिकच्या व्यवस्थापनासाठी तसेच उद्भवणारी पूर व इतर सर्व आपत्कालीन परिस्थिती साठी या यंत्रणेचा उपयोग होणार आहे. नुकताच संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे व सर्व नगरसेवकांचा मुंबई महानगरपालिकेचा अभ्यास दौरा झाला. या दौऱ्यात मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूमची पाहणी करण्यात आली. त्याच धर्तीवर संगमनेरातही आता कंट्रोल रूम उभारण्यात येणार आहे.
अवश्य वाचा : पाणी आरक्षण व आवर्तनावरून निळवंडे कृती समिती आक्रमक; अधिकाऱ्यांना निवेदन
तालुका पातळीवर प्रथमच आधुनिक सीसीटीव्ही यंत्रणांचे जाळे (Satyajit Tambe)
यापूर्वी २०१९ मध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजीत तांबे यांच्या माध्यमातून संगमनेर शहरासाठी सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्या माध्यमातून तालुका पातळीवर प्रथमच आधुनिक सीसीटीव्ही यंत्रणांचे जाळे निर्माण झाले. आता नव्याने मंजूर झालेल्या १ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणारी आपत्कालीन कंट्रोल रूम ही पोलीस यंत्रणा व संगमनेर नगरपालिका यांच्या संयुक्त वापरासाठी असणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पहिल्या शंभर दिवसाचा कार्य अहवाल जनतेसमोर मांडणार
संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेसाठी महिलादिनानिमित्त (ता.८ ) मार्चला रक्षक दल स्थापना करण्यात आले. गेल्या दहा दिवसातच रक्षक दलाच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी झाली आहे. आता हे रक्षक दल सीसीटीव्ही यंत्रणा देखील तपासणार असून पोलीस यंत्रणा आणि रक्षक दलाच्या माध्यमातून एकत्रित काम करेल. निवडून आल्यानंतर संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही कायदा व्यवस्थेसह विविध कामे मार्गी लावत आहोत. कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन यासह सुसंस्कृत आणि सुंदर शहर घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असणार आहोत. (ता. १) मे आम्ही आमच्या पहिल्या शंभर दिवसाचा कार्य अहवाल देखील जनतेसमोर मांडणार असल्याचे नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी सांगितले.



