Savitribai Phule : पारनेर : स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले (Krantijyoti Savitribai Phule) आणि त्यांना खंबीर साथ देणाऱ्या क्रांतीदूत फातिमा शेख (Fatima Sheikh) यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पारनेर शहरात अभूतपूर्व वैचारिक प्रबोधनाचा जागर करण्यात आला. ‘सावित्री-फातिमा सद्भावना मंच’च्या वतीने आयोजित या सोहळ्यात वक्त्यांनी स्त्री शिक्षण (Women’s education), सामाजिक ऐक्य आणि समतेचा संदेश दिला.
नक्की वाचा : निवडणुकीत ‘बिनविरोध’च्या तक्रारीत तथ्य आढळल्यास काय होणार ?
सरस्वती जावळे यांनी सावित्रीमाईंच्या संघर्षाचा पट मांडला
या विशेष प्रबोधनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका सरस्वती जावळे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सावित्री फातिमा सद्भावना मंचचे कार्याध्यक्ष तथा संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रफिक सय्यद उपस्थित होते. विचार पीठावर शिक्षिका शगुप्ता शेख, ॲड. सविता नगरे, ॲड. मोनिका सोनवणे, ॲड. सुनीता शिंदे आणि ॲड. स्वाती पठारे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवताना सरस्वती जावळे यांनी सावित्रीमाईंच्या संघर्षाचा पट मांडला. त्या म्हणाल्या की, “आज स्त्रिया ज्या शिखरावर आहेत, त्यामागे सावित्रीमाई आणि फातिमा शेख यांचे अपार कष्ट आहेत. हा वारसा केवळ भाषणातून नाही, तर कृतीतून पुढे नेण्याची गरज आहे.”
प्रमुख वक्ते डॉ. रफिक सय्यद यांनी आपल्या अभ्यासू शैलीत सावित्री-फातिमा यांच्या मैत्रीचे आणि संघर्षाचे दाखले दिले. “सावित्रीमाईंनी जेव्हा शिक्षणाची ज्ञानज्योत पेटवली, तेव्हा त्यांना फातिमा शेख यांनी मोलाची साथ दिली. हा केवळ दोन स्त्रियांचा प्रवास नव्हता, तर तो एका नव्या आधुनिक भारताचा पाया होता,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
अवश्य वाचा: अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर : रवींद्र चव्हाण; युतीच्या प्रचाराला प्रारंभ
वृक्षाला जल समर्पण करून अभिवादन (Savitribai Phule)
कार्यक्रमास पारनेर तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये राजेंद्र करंदीकर, संभाजी औटी, सुरेश रोकडे, शाहूराव औटी (सर), भाऊसाहेब औटी, बाळासाहेब शेटे, मनोज सूर्यवंशी,सचिन पठारे, अरुण गायकवाड, बाळासाहेब पातारे, डॉ. सादिक राजे, शैलेंद्र औटी, हमजेखा मोमीन, भिकाजी जगदाळे, सलीम राजे, राजुभाई शेख, डॉ.मुद्दसर सय्यद,सुनील शिंदे, किरण सोनवणे, संपत पवार, अविनाश देशमुख, सुनील चौधरी, गिरीश साळवे, ऋतुजा डेंगळे, यांचा समावेश होता. यावेळी उपस्थितांनी सावित्रीमाई आणि फातिमा शेख जयंती निमित्त वृक्षाला जल समर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते, यावेळी रोशनी गायकवाड, वेदिका भोसले, प्रांजल सूर्यवंशी, चंद्रांशु साळवे, मृण्मयी करंदीकर, प्रिती कांबळे, श्रेया सातपुते या विद्यार्थिनी त्यांच्या ओजस्वी आणि परखड भाषणातून उपस्थितांची मने जिंकली. ज्यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ॲड. सविता नगरे, ॲड. मोनिका सोनवणे, ॲड. सुनीता शिंदे, शगुप्ता शेख यांनी सावित्री फातिमा यांचे समाजाप्रती योगदान, शिक्षण, समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन आणि मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. पारनेरमधील या सोहळ्याने केवळ जयंती साजरी न करता, एक वैचारिक दिशा देण्याचे काम केले आहे, अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन गौतम साळवे यांनी केले. तर भाऊसाहेब औटी यांनी आभार मानले.



