Schemes of Govt: पारनेर: शासनाच्या योजना (Schemes of Govt) कागदावर न राहता त्या थेट नागरिकांपर्यंत पोहोचवा, अशा सूचना आमदार काशिनाथ दाते यांनी केल्या. महसूल विभागाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण व्हावे, तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान व्हावे या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ (‘Shrimant Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Camp Campaign’)अंतर्गत आज (ता.९) नगर तालुक्यातील चास येथे मंडळस्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
अवश्य वाचा- दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर जय पवार यांचं सूचक वक्तव्य
विविध शासकीय योजनांचा लाभ (Schemes of Govt)
या शिबिराचे उद्घाटन पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते झाले. या उपक्रमाद्वारे चास मंडळातील ग्रामीण भागातील नागरिकांना रहिवासी, उत्पन्न व जातीचे दाखले, रेशन कार्ड वाटप, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना यांसह विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. तसेच सात-बारा उतारे वाटप, प्रलंबित फेरफार नोंदींचे निराकरण आणि विविध योजनांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता यासंबंधी कामेही तात्काळ करण्यात आली. नागरिकांच्या सोयीसाठी महसूल विभागासह कृषी, पंचायत समिती, ग्रामपंचायत, आरोग्य, पशुसंवर्धन, समाजकल्याण, महिला व बालविकास, महावितरण, अन्न व नागरी पुरवठा, परिवहन (एस.टी.), शिक्षण आदी विविध विभागांचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले होते. यामुळे उपस्थित नागरिकांनी आपल्या अडचणी मांडून तत्काळ मार्गदर्शन व सेवा प्राप्त केली.यावेळी बोलताना आमदार काशिनाथ दाते म्हणाले की, “शासनाच्या योजना कागदावर न राहता त्या थेट नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हा या शिबिरामागचा मुख्य उद्देश आहे. सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सेवा वेळेत आणि सुलभ पद्धतीने मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अशा शिबिरांमुळे जनतेचा शासनावरचा विश्वास अधिक दृढ होतो आणि प्रशासन खऱ्या अर्थाने लोकाभिमुख बनते.”
नक्की वाचा- आता झेडपी शाळेत प्रवेशावर मिळणार ‘ही’ मोठी सवलत
नागरिकांच्या अनेक प्रलंबित कामांना गती (Schemes of Govt)
या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, नायब तहसीलदार गौरव दळवी, शिवराज पवार, माजी सभापती रामदास भोर, सरपंच युवराज कार्ले, सरपंच सोनेवाडी विठ्ठलराव दळवी, युवा नेते सिद्धेश आंधळे, वैष्णव पठारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सेतु चालक, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरामुळे नागरिकांच्या अनेक प्रलंबित कामांना गती मिळाली असून प्रशासनाच्या लोकाभिमुख उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडलाधिकारी रुपाली टेमक यांनी केले.



