Senapati Bapat : नगर : महाराष्ट्र शासनाचा (Government of Maharashtra) मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या समन्वयाने स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट (Senapati Bapat) यांच्या लेखन-विचारांना उजाळा देणाऱ्या साहित्य संमेलनाचे (Literary Conference) आयोजन केले जाणार आहे. जिल्हास्तरीय साहित्य संमेलन योजनेतून निंबळक (ता. अहिल्यानगर) येथील आत्मनिर्धार फाऊंडेशन संस्थेतर्फे नगर शहरात नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात याचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष महादेव गवळी यांनी दिली.
नक्की वाचा : मोहटादेवी गडावर नवरात्रात पोलीस बंदोबस्तात वाढ; सोमनाथ घार्गे यांचे आश्वासन
अधिक माहिती देताना अध्यक्ष गवळी म्हणाले की,
महाराष्ट्र शासनाने जिल्हावार संमेलनासाठी प्रस्ताव मागणी केली होती. प्राप्त प्रस्तावांपैकी मंडळाच्या सदस्यांनी बहुमताने आत्मनिर्धार फाऊंडेशन या संस्थेच्या नाविन्यपूर्ण प्रस्तावाला मान्यता दिली. संस्थेने संमेलनाला ‘स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट’ यांचे नाव दिले आहे. सेनापती बापट यांच्या लेखन आणि विचारांना यानिमित्ताने पुन्हा एकदा उजाळा देण्याचा प्रयत्न आहे. नुकतेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने संस्थेला याबद्दलचे मंजुरी पत्र आणि मार्गदर्शक सूचनांची यादीही पाठवली आहे. सदर सूचनांचे पालन करत साहित्य संमेलन यशस्वी केले जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील साहित्यिक आणि वाचक यांचीही मदत घेतली जाणार आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगर महापालिकेतील प्रभाग सहामध्ये इच्छुक उमेदवार लागले तयारीला
“भूमिपुत्राच्या विचारांची नव्याने ओळख व्हावी” (Senapati Bapat)
१९८० मध्ये पांडुरंग महादेव बापट यांचा जन्म पारनेर येथे झाला. पुढे त्यांनी पुणे आणि अगदी परदेशात लंडन येथे जाऊन शिक्षण घेतले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटवला. मुळशी धरणग्रस्तांच्या पाठीशी उभा राहून त्यांनी लढा दिल्याने त्यांना सेनापती ही उपाधी जनतेने बहाल केली. काँग्रेस पक्षासह त्यांनी विविध संघटनांमध्ये काम केले. क्रांतिकारी चळवळीत कार्य करताना त्यावेळी त्यांनी रशियन क्रांतिकारकांच्या मदतीने बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्याचा प्रोटोटाईप त्यांनी पुढे युरोपातून भारतात पाठवला. त्यामुळे क्रांतीकारी चळवळीला यातून मोठी मदत झाली. त्यामुळे त्यांच्या लेखन-विचारांना पुन्हा उजाळा मिळावा असा संमेलनाच उद्देश आहे. सेनापती हे नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमंती करून स्वातंत्र्य चळवळींमध्ये महत्वाचे योगदान दिले आहे. नव्या पिढीला त्यांच्याबद्दल माहिती व्हावी यासाठी त्यांच्या नावाने साहित्य संमेलन घेतले जाणार आहे, अशी माहिती गवळी यांनी दिली.
संमेलन नियोजनाची पहिली बैठक नुकतीच रविवारी (दि. १४ नोव्हेंबर) पार पडली. यावेळी प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, प्रा. डॉ. महेबुब सय्यद, लेखक सचिन मोहन चोभे, ह.भ.प. सिद्धिनाथ मेटे महाराज उपस्थित होते. तर, ज्येष्ठ साहित्यिक रामदास कोतकर यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठीचा निर्धार यावेळी व्यक्त केला. कवी ॲड. राहुल ठाणगे, बलभीम निमसे, नामदेव लोंढे यांनीही ऑनलाईन पद्धतीने बैठकीत सहभागी होऊन मार्गदर्शक सूचना केल्या.
“जिल्ह्यातील साहित्यिक-वाचकांनी संयोजनासाठी मदत करावी”
महाराष्ट्र शासनाने जिल्ह्यातील स्थानिक साहित्यिकांना प्रतिनिधित्व मिळावे. वाचकांना आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि साहित्यिक चळवळीत त्यांचा सहभाग वाढवा या हेतूने जिल्हावार संमेलने घेण्याचे ठरविले आहे. अभिजात मराठी भाषेसाठी असे कार्यक्रम महत्वाचे आहेत. त्यानुसार आत्मनिर्धार फाऊंडेशन हे नगर जिल्ह्यातील साहित्यिक, लेखक, कवी, रसिक वाचक, प्रकाशक, शिक्षक, व्यावसायिक, उद्योजक, विद्यार्थी, शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था व कोचिंग क्लासेस अशा सर्वांनाच संयोजनासाठी मदत करण्याचे आवाहन करत आहे. संयोजन समिती ही सर्वांसाठी खुली असेल. त्यामुळे यासाठी इच्छुकांनी ॲड. राहुल ठाणगे (मो. 7040144341) व रामदास कोतकर (मो. 9890997684) यांच्याकडे संपर्क साधावा. येत्या रविवारी ( दि. २१ सप्टेंबर) सकाळी १० वाजता नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील अमोल सायंबर संचलित मास्टरमाईंड करिअर अकॅडमी येथे याबद्दलची पहिली महत्त्वपूर्ण बैठक होईल. या बैठकीसाठी साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलन यशस्वितेसाठी सूचना कराव्यात, असे आवाहन ह.भ.प. मेटे महाराज यांनी केले आहे.