Senapati Bapat Sahitya Sammelan : नगर : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या (Marathi Literature) अंतर्गत साहित्य आणि संस्कृती मंडळांच्या समन्वयाने अहिल्यानगर शहरात दिनांक ८-९ नोव्हेंबर २०२५ रोजी सुखकर्ता लॉन व मंगल कार्यालय (नेप्ती बायपास चौकाजवळ, कल्याण रोड, अहिल्यानगर) येथे दोन दिवसीय सेनापती बापट साहित्य संमेलनाचे (Senapati Bapat Sahitya Sammelan) आयोजन करण्यात येत आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी-लेखक इंद्रजीत भालेराव (Indrajeet Bhalerao) यांची निवड करण्यात आल्याची माहिती संयोजक सचिन मोहन चोभे यांनी दिली.
नक्की वाचा : ओवैसींच्या सभेत महिला पदाधिकाऱ्याचा ‘जय भीम,जय शिवराय’चा नारा
याबद्दल माहिती देताना चोभे यांनी सांगितले की,
स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट यांच्या विचारांना उजाळा देण्याच्या उद्देशाने यंदाच्या साहित्य संमेलनास त्यांचे नाव दिलेले आहे. चालू वर्षी अवघ्या महाराष्ट्रात ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी-कष्टकरी यांच्यावर संकट ओढवले आहे. अशावेळी साहित्याच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी व वंचित घटकांच्या परिस्थितीवर चर्चा होण्याच्या उद्देशाने सुप्रसिद्ध कवी-लेखक इंद्रजीत भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. आत्मनिर्धार फाउंडेशन (निंबळक, ता. नगर) यांना यंदाच्या जिल्हा साहित्य संमेलनाचे नियोजन करण्याचा मान मिळाला आहे. जिल्ह्यासह शेजारील पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर आदि जिल्ह्यातील साहित्यिक, कवी आणि साहित्यरसिक या संमेलनात सहभागी होत आहेत.
अवश्य वाचा : अहिल्यानगर महापालिकेचा गलथान कारभार; सहा महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडले
विविध कार्यक्रमांची असणार रेलचेल (Senapati Bapat Sahitya Sammelan)
दोन दिवसीय साहित्य संमेलनात व्याख्यान, लोककलांचे सादरीकरण, परिसंवाद, काव्य संमेलन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य तथा निरीक्षक बी. जी. शेखर व डॉ. राजेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सत्राचे नियोजन केले जात आहे. नामांकित आणि नवसाहित्यिकांचा मेळ बसवून सत्र ठरवले जात आहेत. संमेलनाच्या अध्यक्षपदावर अनेक नावांची चर्चा झाली. मात्र, एकूण ग्रामीण भागातील महत्वाचे संमेलन लक्षात घेऊन यंदा शेती-मातीची भाषा बोलणारे लेखक-कवी म्हणून सुप्रसिद्ध कवी-लेखक इंद्रजीत भालेराव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संयोजन समितीचे कार्याध्यक्ष ह. भ. प. सिद्धीनाथ मेटे महाराज यांनी दिली.
विद्यार्थी, शिक्षकांसह हजारोंचा सहभाग
आयोजक संस्था आत्मनिर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, अशा पद्धतीने जिल्हास्तरावर साहित्य संमेलनाची संधी मिळाल्याने एकूणच संपूर्ण जिल्ह्यातील साहित्यिक-कवी यांनी सर्वोतोपरि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच शैक्षणिक संस्था, विविध सरकारी कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांचीही मदत घेतली जात आहे. अनेक शाळांतील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकांनाही यामध्ये निमंत्रित केले आहे. महिला साहित्यिकांनाही यामध्ये विशेष संधी देण्यासाठी आमची संयोजन समिती विशेष प्रयत्न करत आहे.
साहित्यरसिकांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न
याबद्दल माहिती देताना संयोजन समितीचे समन्वयक लेखक रामदास कोतकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्वच साहित्यिकांच्या संस्थांशी आम्ही संपर्क करत आहोत. नवसाहित्यिक आणि जुने साहित्यिक एकत्र काम करत असल्याने हे संमेलन निश्चित यशस्वी होईल. प्रत्येक सत्र साहित्यरसिकांसाठी महत्वाचे असेच असेल. नेटके आणि काटेकोर नियोजन करून अधिकाधिक साहित्यिक आणि रसिकांना सहभागी करून घेण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे नियोजन केले जात आहे. तसेच यापुढेही कोणालाही संमेलनास आर्थिक किंवा सामाजिक भावनेने मदत करण्याची इच्छा असल्यास त्यांनीही यामध्ये सहभागी व्हावे. सर्वांच्या सहकार्यानेच हा कार्यक्रम यशस्वी होणार आहे.