Seth Hirachand Nemchand Jain Digambar Boarding Pune : पुणे : ‘अहिंसा परमो धर्म की.. जय’, ‘धर्माचा व्यापर बंद करा’, ‘धर्म विकायची किंवा खरेदी करण्याची वस्तू नाही’, ‘शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगची (Seth Hirachand Nemchand Jain Digambar Boarding Pune) जागा वाचवा’, ‘जैन मंदिर वाचवा’, ‘जब तक सूरज-चांद रहेगा एचएनडी तेरा नाम रहेगा’ अशा घोषणा देत चारही पंथातील प्रक्षुब्ध जैन समाजाने (Jain Society) एकत्र येऊन पुणे येथील जैन बोर्डिंगच्या जागा विक्रीच्या निर्णयाला विरोध केला. भव्य मोर्चाद्वारे आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी पुणे (Pune) यांना देण्यात आले.
अवश्य वाचा : आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे धक्का बसला, डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली हळहळ
काही विश्वस्तांकडून बेकायदेशीरपणे विक्री
मॉडेल कॉलनी परिसरातील पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगची (जैन बोर्डिंग) जागा काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विकली आहे. या निर्णयाला जैन समाजाने तीव्र विरोध केला आहे. जमीन विक्रीविषयी जाहीर नाराजी व्यक्त करण्यासाठी जैन बोर्डिंग बचाव कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रातील जैन बांधवांनी काळ्या फिती लावून आणि निषेधाचे फलक घेऊन आज (दि. 17) जैन बोर्डिंग ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढला. मोर्चाच्या अग्रभागी आचार्य गुरुदेव श्री गुप्तीनंदजी महाराज, तीर्थेष ऋषिजी, माताजी महाराज हे मुनीगण होते. अभय छाजेड, प्रशांत जगताप, अरविंद शिंदे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, रवींद्र धंगेकर यांनी भेट देऊन जैन समाजाच्या मागणीस पाठींबा दर्शविला.
नक्की वाचा : दूध व्यवसाय ते सत्तेच्या शिखरापर्यंत; शिवाजीराव कर्डिलेंचा राजकीय प्रवास
जैन बोर्डिंग येथून मोर्चाला सुरुवात (Seth Hirachand Nemchand Jain Digambar Boarding Pune)
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले जैन बांधव-भगिनी मोठ्या संख्येने जैन बोर्डिंगच्या आवारात एकत्र आले. येथे आचार्य गुरुदेव श्री गुप्तीनंदजी महाराज यांनी जमीन विक्री बेकायदा असून त्याविरोधात सर्वांनी एकत्रितपणे लढा द्यायचा आहे, असे आवाहन केले.
त्यानंतर जैन बोर्डिंग येथून मोर्चाला सुरुवात झाली. संचेती हॉस्पिटल, जुना बाजार या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांततेत मोर्चा नेण्यात आला. हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. जैन समाजातील शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन सादर केले.
या संदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट ही सन 1958 साली स्थापन झालेली सार्वजनिक धर्मदाय संस्था असून संस्थेच्या ताब्यात मॉडेल कॉलनी येथील सुमारे 12 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड आहे. या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग व श्री 1008 भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर अस्तित्वात आहे.
ट्रस्टच्या संपत्तीबाबत काही व्यक्तींमार्फत विकसकांशी व्यवहार करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. तरीही स्थानिक स्तरावर विकास कामे व हस्तक्षेप होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे जैन समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या ठिकाणी असलेले जैन मंदिर हजारो जैन बांधवांच्या श्रद्धेचे केंद्र असून ते धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. मंदिर व वसतिगृहाच्या अस्तित्वावर कोणत्याही प्रकारे गदा येऊ नये ही जैन बांधवांची अपेक्षा आहे. जैन मुनी आचार्य गुरुदेव श्री गुप्तीनंदजी महाराज हे त्यांच्या संघासह सध्या जैन बोर्डिंग येथे वास्तव्यास आहेत.
आठ ऑक्टोबर 2025 रोजीचा ट्रस्ट आणि विकसक यांच्यातील विक्रीकरार आणि त्यानंतरचा कर्ज करार रद्द करावा आणि वसतिगृहाची मालमत्ता वसतिगृह आणि ट्रस्टच्या संबंधित धर्मादाय कारणांसाठीच वापरली जावी, अशी वसतिगृहातील विद्यार्थी आणि जैन समाजाची मागणी आहे.
याचिकाकर्ता आनंद कांकरिया, स्वप्नील गंगवाल, ॲड. योगेश पांडे, ॲड. जिंतूरकर, अक्षय जैन यांच्यासह युथ कार्यकर्ते आणि बोर्डिंगमधील आजी माजी विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले होते.
मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल : लक्ष्मीकांत खाबिया
जैन बोर्डिंगच्या जमीनविक्रीप्रकरणी लक्ष्मीकांत खाबिया, ॲड. योगेश पांडे आणि आनंद कांकरिया यांनी गुरुवारी (दि. 16) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी सर्व कायदेशीर बाबी समजून घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी आज जैन समाजातील शिष्ट मंडळाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून वसतिगृह आणि मंदिराविषयी समजावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही दिली आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वास दिले, असे लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले.