Shalinitai Vikhe : नगर : विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळालाही (Sports) प्राधान्य देऊन जिद्दीने खेळातून करीअर घडवावे, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे (Shalinitai Vikhe) पाटील यांनी व्यक्त केली. प्रवरामध्ये क्रीडा सुविधांचा सातत्याने विस्तार होत असून खेळाडू (Players) वृत्तीने जीवनाचा सामना करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
नक्की वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती
नऊ संघांतील १४४ खेळाडू सहभागी
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी, अहिल्यानगर तसेच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी, प्रवरा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने १७ वर्षे मुलींचा राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप २०२५ स्पर्धेचे उद्घाटन लोणी येथे करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, तालुका क्रीडा अधिकारी प्रवीण कोढवळे व कॅम्प संचालक डॉ. आर. ए. पवार उपस्थित होते. स्पर्धेत नागपूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर व क्रीडा प्रबोधिनी या नऊ संघांतील १४४ खेळाडू सहभागी झाले आहेत.
अवश्य वाचा : इथे मृत्यूही ओशाळला! वाहनाला बांधून पतीला न्यावा लागला पत्नीचा मृतदेह
उद्घाटन सामन्यात अमरावतीने केला नाशिकचा पराभव (Shalinitai Vikhe)
उद्घाटन सामन्यात अमरावतीने नाशिकचा ४–० असा पराभव केला. स्पर्धेतील उप-उपांत्य फेरीचे सामने आज, तर उपांत्य फेरी व अंतिम सामना गुरुवारी होणार आहेत. पंच व संयोजनाची जबाबदारी अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल संघटनेचे अभिषेक सोनवणे, अभय साळवे, अतुल डे, विल्यम राज व जिरेमिया लूमट्राऊ यांनी सांभाळली.
जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी शैक्षणिक सुविधांसह सुसज्ज क्रीडांगणे, इनडोअर स्टेडियम व विविध योजनांद्वारे राज्य शासनाकडून क्रीडाक्षेत्राला आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली. संस्थेच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमीमुळे विविध खेळांना बळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन सुरेश गोडगे यांनी केले.