Shani Shingnapur : नेवासा : श्री क्षेत्र शनिशिंगणापूर संस्थांनचे (Shri Shaneshwar Devasthan Shanishingnapur) आता विशेष ऑडिट (Special Audit) होणार असल्याची घोषणा विधानसभेत (Assembly) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली आहे. देवस्थानमध्ये चालू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची (Corruption) चौकशी सचिव दर्जाच्या सक्षम अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे शनेश्वर देवस्थान विश्वस्त अधिनियम २०१८ ची अंमलबजावणी होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
नक्की वाचा : नेवासा बुद्रुक येथे चंपाषष्ठी उत्सवाची सांगता
विधान परिषदेत शनिशिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या परवानगीने कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा प्रकार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekher Bawankule) यांनी ‘लक्षवेधी’च्या माध्यमातून मांडला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे तसेच सभागृहात पारित झालेल्या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल,अशी माहिती सभागृहात दिली.
अवश्य वाचा : पिंपळगाव माळवी येथील मंदिरात चोरी करणारा जेरबंद
शनिशिंगणापूर देवस्थान मध्ये ६५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना १८०० कर्मचारी हे देवस्थानमध्ये काम करत असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. ६५ पैकी १२ कर्मचारीच हे कामावर येत असून बाकीच्यांना घरबसल्या पगार मिळत असल्याचा मुद्दा बावनकुळे यांनी मांडला. सोबतच शनिशिंगणापूर येथील चौथर्यावर जाण्यासाठीची पाचशे रुपयांची पावती ही संस्थानमध्ये न बनवता ती बाहेरच बनवली गेली असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. या पावतीच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित देणगी ही शनेश्वर नावाच्या खासगी शाळेच्या नावावरती वसूल केली असल्याचं बावनकुळे यांनी म्हटल आहे.
शनिशिंगणापूर येथे २४ तास वीज असताना देखील ४० लाख रुपयांचे डिझेल प्रत्येक महिन्याला जनरेटरसाठी वापरले असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शनिशिंगणापूर देवस्थानला मागच्या दहा वर्षांमध्ये जेवढे काही दान आले आणि त्याचा खर्च कुठे झाला याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी देखील शनिशिंगणापूर देवस्थान मध्ये भ्रष्टाचार झाल्याचं सांगत याबाबत लवकरच उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असं म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी शनिशिंगणापूर येथील भ्रष्टाचाराबाबत ऋषिकेश शेटे व भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील भेट दिली होती आणि हा प्रश्न अधिवेशनामध्ये उपस्थित करू, असं आश्वासन दिलं होतं, त्यानुसार हा प्रश्न आता अधिवेशनात आल्यानं या संदर्भामध्ये चौकशी होणार आहे. हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केल्याने शनिशिंगणापूर येथील युवकांनी फटाके फोडून जल्लोष केला.
लक्षवेधीची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे, संस्थांच्या सर्व व्यवहारांचे ऑडिट करण्याचे व लवकरात लवकर शनेश्वर देवस्थान विश्वस्त अधिनियम २०१८ ची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.तसेच सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला पाठवून चौकशी करून २ महिन्यात अहवाल घेण्यात येईल, असे सांगितले आहे.