| राहाता: पारंपारिक वाद्य, साई नामाचा जयघोष, विविध शाळांचे चित्ररथ व लाखो भाविकांची गर्दी अशा भक्तिमय व उत्साही वातावरणात शिर्डी महापरिक्रमेची ( Shirdi Mahaparikrama) सांगता झाली. शिर्डी साई महापरिक्रमेसाठी जगभरातून भाविक साईच्या दरबारी दाखल झाले होते. पंधरा देशातील भाविकांनी तसेच सुमारे अडीच लाख साई भक्तांनी परिक्रमेत सहभागी होऊन साईभक्तीचा आनंद लुटला. शिर्डी शहरातील खंडोबा मंदिरासमोर सकाळी साडेपाच वाजता रथातील साईबाबांच्या प्रतिमेची महाआरती करुन महंत रामगिरी महाराज, काशीकानंद महाराज देऊडकर महाराज माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील तसेच साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते रथ साईबाबांचा ओढून शिर्डी महापरीकमेला सुरुवात झाली होती.
अवश्य वाचा- उन्हाळ्याची चाहूल लागताच पुण्यात पावसाच्या सरी बरसणार;काय सांगतो हवामान विभागाचा अंदाज ?
प्रशासकीय यंत्रणेचे परिक्रमेसाठी मोठे सहकार्य (Shirdi Mahaparikrama)
सकाळी पावणेसहा वाजता सुरू झालेली महा परिक्रमा 14 किलोमीटरचे अंतर पार करून दुपारी एक वाजता खंडोबा मंदिर स्थळी पुन्हा आली श्री साईबाबांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या आणि भक्तीचा महासागर लोटणाऱ्या ‘शिरडी परिक्रमा महोत्सवाचे आयोजनात ग्रीन एन क्लीन शिरडी फाउंडेशनची महत्त्वाची भूमिका होती श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्था, शिर्डी नगरपरिषद शिर्डी पोलीस स्टेशन आणि समस्त शिरडी ग्रामस्थांनी, प्रशासकीय यंत्रणेने परिक्रमेसाठी मोठे सहकार्य व महत्त्वपूर्ण योगदान दिल्याने भाविकांची कुठलीही गैरसोय झाली नाही. शिर्डी सह परिसरातील विद्यार्थ्यांची लेझीम आणि पावली पथके, संबळ पथक, विविध चित्ररथ आणि भजनी मंडळी या भक्ती सोहळ्यात मोठे भक्तिमय उत्साही वातावरण निर्माण करून रंगत निर्माण केली. साई परिक्रमेत सहभागी झालेल्या भक्तांच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी पूर्ण सजली होती.
नक्की वाचा- भाजप म्हणजे विषारी साप!कधीही नाग पाठवू शकतात;बच्चू कडू यांची जहरी टीका
परिक्रमा मार्गावर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव (Shirdi Mahaparikrama)
परिक्रमा मार्गावर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव व आकर्षक रांगोळी काढलेली होती, दिवे प्रज्वलित केलेले होते. अनेक ठिकाणी स्वागत कमानी उभारल्या होत्या. शिर्डीकर ग्रामस्थ स्वतः रस्त्यावर उतरून साईभक्तांचे स्वागत करत होते. शेकडो स्वयंसेवक परिक्रमा मार्गावर साई भक्तांच्या सेवेत होते. महा परिक्रमा एकादशीच्या दिवशी आल्याने एकादशी निमित्त फराळाची विशेष सोय दानशूर भाविकांनी केली होती. मार्गावर १०० हून अधिक ठिकाणी सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांतर्फे साबुदाणा खिचडी, फळे, चहा-नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा आणि सुविधांवर विशेष भर म्हणून गर्दीच्या नियोजनासाठी ग्रीन एन क्लीन फाउंडेशन आणि पोलीस प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे त्याचबरोबर 500 स्वयंसेवक देखील नियुक्त केले होते गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी वॉच टॉवर्स उभारण्यात आले होते. ‘ड्रोन’ कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आकाशातूनही नजर ठेवली जात होती. परिक्रमा मार्गावर ठिकठिकाणी पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र फिरते शौचालय, प्रथमोपचार केंद्रे आणि रुग्णवाहिका तैनात होत्या. परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने भाविकांना प्रसादाचे आणि उदीचे वाटप केले.



