Shirdi news: शिर्डीमध्ये (Shirdi) येणाऱ्या साईभक्तांची लूट आता थांबणार आहे. कारण शिर्डी नगरपरिषदेने भाविकांच्या आर्थिक लुटीला आळा घालण्यासाठी एक नवा प्रयोग सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. शिर्डीतील व्यावसायिकांसाठी हार, प्रसाद, फूल आणि शाल यांसह अनेक वस्तूंचे दरपत्रक (Price list) म्हणजेच रेटकार्ड (Ratecard) तयार करण्यात आलंय. १५ जुलैपर्यंत व्यावसायिकांनी हे दरपत्रक दुकानासमोर लावण्याची नोटीसच शिर्डी नगरपालिकेने (Shirdi Municipality) काढली आहे. विशेष बाब म्हणजे हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे हा प्रयोग पथदर्शी ठरेल असं बोललं जात आहे. शिर्डी संस्थान, नगरपरिषद आणि शिर्डी पोलीस यांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आलाय.
नक्की वाचा : ‘उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करायला पाहिजे’;अनिल बोंडेंची टीका
भाविकांची आर्थिक लूट थांबणार (Shirdi news)
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येत असतात. मात्र भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन काही दुकानदार आणि एजंट फुल, प्रसाद, पूजेचं साहित्य हे मुळ किमतीपेक्षा अव्वाच्या सव्वा दराने विकून भाविकांची आर्थिक लूट करत असल्याच्या अनेक घटना ही समोर आल्यात. फसवणूक झाल्याचं समजल्यावर अनेकदा भाविक आणि दुकानदार यांच्यात वाद देखील होतात. त्यामुळे हे सर्व प्रकार टाळण्यासाठी शिर्डी नगरपरिषदेने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
अवश्य वाचा : ‘संजय राऊत यांच्या बुद्धिमतेची चाचणी तिसरीत करावी लागेल’- आशिष शेलार
दुकानांचे नाव, किंमत असणे बंधनकारक (Shirdi news)
आता या नव्या नियमांनुसार शिर्डी शहरातील प्रत्येक दुकानदार, हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांना प्रशासनाने ठरवून दिलेले दरपत्रक म्हणजेच रेटकार्ड हे दर्शनी भागात लावणे सक्तीचं आहे. या दरांच्या आतच चांगल्या गुणवत्तेच्या आणि योग्य वजनाच्या वस्तूंची विक्री करणे विक्रेत्याला बंधनकारक असेल. तसेच प्रत्येक वस्तूवर दुकानाचे नाव, किंमत, एक्सपायरीडेट आणि संपर्क क्रमांक नमूद करणे आवश्यक असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी स्पष्ट केले आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार (Shirdi news)
नगरपरिषदेने लागू केलेल्या या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नगरपरिषद आणि पोलिस विभागामार्फत संयुक्तपणे कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी १५ जुलै २०२५ पर्यतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. यानंतर विशेष भरारी पथके शहरात नियमित पाहणी करून या नियमांचे पालन होतं की नाही याची कडक तपासणी करणार आहेत. तर माहितीच्या प्रसारासाठी प्रशासनाकडून क्यूआर कोड आणि सार्वजनिक ठिकाणी फलकही लावले जाणार आहेत. या निर्णयामुळे एका बाजूला भक्तांची फसवणूक थांबेल, तर दुसऱ्या बाजूला प्रामाणिक व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे