Shivajirao Kardile : आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे धक्का बसला, डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली हळहळ

Shivajirao Kardile

0
Shivajirao Kardile : आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे धक्का बसला, डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली हळहळ
Shivajirao Kardile : आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे धक्का बसला, डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली हळहळ

Shivajirao Kardile : राहाता : राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे (Rahuri Assembly constituency) विद्यमान आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. फक्त ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय (Political) आणि सहकार क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

नक्की वाचा : शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोगातून उत्पन्न वाढवावे : जिल्हाधिकारी आशिया

कालच केले होते एकत्र जेवण

कालच आमदार कर्डिले हे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवासस्थानी गेले होते. एकत्र जेवण, संवाद आणि विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर काही तासांतच त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अवश्य वाचा: राजेंद्र फाळकेंच्या राजीनाम्यामागे हे आहे राजकीय कारण, जाणून घ्या!

मला विश्वास बसत नाही (Shivajirao Kardile)

“ही वार्ता हृदय पिळवटून टाकणारी आहे. अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडली आहे. कालच आम्ही एकत्र होतो आणि आज ते आपल्यात नाहीत, हे स्वीकारणं कठीण आहे,” अशी प्रतिक्रिया डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, “कर्डिले साहेबांशी आमचे मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जिल्ह्याला ठाऊक आहेत. विखे आणि कर्डिले परिवार मागील अनेक दशकांपासून एकत्र राहिले आहेत. राजकीय क्षेत्रात आम्ही नेहमी खांद्याला खांदा लावून काम केलं. माझ्या दृष्टिकोनातून ते अहिल्यानगर जिल्ह्याचे एक राजकीय गुरु होते. त्यांच्या जाण्याने केवळ आम्हीच नव्हे तर संपूर्ण महायुती आणि भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.”

शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या दीर्घ राजकीय प्रवासात सहकार, शेती, शिक्षण आणि पायाभूत विकास क्षेत्रात अमूल्य योगदान दिलं. अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन, राज्यमंत्री आणि जनतेचे खरे हितचिंतक म्हणून त्यांनी लोकांशी थेट नाळ जोडली होती. साधेपणा, लोकाभिमुख कार्यशैली आणि प्रामाणिक सेवाभाव या गुणांनी त्यांचं व्यक्तिमत्त्व उठून दिसलं.

त्यांच्या जाण्याने केवळ एक जननेता हरपला नाही, तर जनसेवेची एक परंपराच खंडित झाली आहे. “त्यांचे आदर्श आणि कार्यशैली हीच आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या विचारांची वाटचाल पुढे नेणं हेच त्यांच्याप्रती खरं श्रद्धांजलीचं रूप ठरेल,” असं डॉ. विखे पाटील म्हणाले.

परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवारास लाभो, अशा शब्दांत डॉ. विखे पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.