Shivraj Singh Chouhan : राहाता: शेतकरी हा देशाचा प्राण आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीचे उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनाने (Central Government) सर्वोच्च प्राधान्य दिले असून यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी केले. राहाता तालुक्यातील बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्र (पायरेन्स) येथे शेतकरी परिसंवादात चौहान यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे (Mahatma Phule Krishi Vidyapeeth) कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुणे शाखेचे संचालक डॉ .एस.के.रॉय, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील उपस्थित होते.
नक्की वाचा : देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना सरकारमध्ये घेतलं?;संजय राऊतांचा सवाल
आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीकडे वळावे लागणार
आपल्याला परंपरागत शेतीकडून आता आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीकडे वळावे लागणार आहे, असे नमूद करून चौहान म्हणाले , यावर्षी ३०० नवीन बीज वाणांचे संशोधन करण्यात आले आहे. खतांवरील अनुदानासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. १ जानेवारी रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत केंद्रशासनाने शेतकरी हिताचे काही निर्णय घेतले. त्यानुसार शेतकऱ्यांना डीएपी खतांची ५० किलोची पिशवी १ हजार ३५० रूपयात दिली जाईल. प्रधानमंत्री कृषी विमा योजनेत पंचनामा करतांना आता ‘गाव’ हा घटक नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविण्यात येऊन शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात येईल. विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई देण्यात उशीर केल्यास १२ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना भरपाई देतील. शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचा पंचनामा आता सॅटेलाईट रिमोट सेन्सिंगद्वारे केला जाणार आहे. यासाठी ८५२ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. ६९ हजार कोटी रूपये पीक नुकसान भरपाईसाठी संरक्षित ठेवण्यात आले आहेत, असे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी सांगितले.
अवश्य वाचा : गणेश मूर्तिकार वरील कारवाई थांबावी; संघटनेचे सभापती राम शिंदे यांना निवेदन
चौहान म्हणाले, (Shivraj Singh Chouhan)
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणून महिलांना आत्मसन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. आता यापुढे महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करून लखपती दिदी बनवण्याचे उद्दिष्ट आहे. देशात ३ कोटी लखपती दिदी निर्माण करायच्या आहेत.
महाराष्ट्रात प्रत्येकाला पक्के घर मिळावे यासाठी आता प्रधानमंत्री आवास योजनेत १३ लाख २९ हजार नवीन घरांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी अटी व शर्तीत शिथिलता आणण्यात आली आहे, असेही चौहान यांनी सांगितले.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले , शासनाने महिलांसोबत शेतकरी, युवक आणि लाडक्या भावांसाठीही लोकाभिमुख योजना राबविल्याआहेत. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केंद्र शासनाचे राज्य शासनाला पाठबळ मिळत आहे. कृषी विज्ञान केंद्रात येत असलेल्या नवीन कृषी तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. याप्रसंगी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते अश्विनी कासार, मोनिका भालेराव, अश्विनी कोळपकर, कमल रोहकले, सुनिता ओहळ, सुनिता लांडे, स्वाती गागरे, कल्पना शिंदे, संगीता भागवत व मंगल खेमनर यांचा प्रातिनिधीक स्वरुपात लखपती दिदी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यशवंत शेतकरी बाबासाहेब गोरे, आशाताई दंडवते, सुभाष गडगे, गणेश अंत्रे, नवनाथ उकिर्डे व मोहन तुंवर यांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कृषी यांत्रिकीकरण आणि एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गतचे लाभार्थी शेतकरी पंकजा दळे, जयश्री निर्मळ, भागवत जाधव व अमोल कासार यांना केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते ट्रॅक्टर वाटप करण्यात आले. याप्रसंगी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनातील सहभागी शेतकरी व महिला बचतगट सदस्यांशी त्यांनी संवाद साधला. सन्मानार्थी लखपती दीदींच्यावतीने अलका कदम यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तम कदम यांनी केले.