New movie: नगर : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) म्हणजे असामान्य पराक्रमांचे अधिपतीच. त्यांच्या याच पराक्रमांची गाथा आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. संभाजी महाराजांवर आधारित ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित (First poster displayed) करण्यात आले आहे. या पोस्टरला सर्वांनी पसंती दर्शवली आहे.
नक्की वाचा : ‘निवेदिता माझी ताई’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरलं गेलेलं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य एक धगधगतं अग्निकुंड म्हणावं लागेल. मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उचललं आहे आणि तेव्हापासून या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात कोण प्रमुख भूमिका साकारणार याची सर्वानाच उत्सुकता लागलेली आहे. तत्पूर्वी ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाच्या लक्षवेधी पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.
अवश्य वाचा : नगरच्या मदारची ‘थर्ड आय एशियन फिल्म’ फेस्टिव्हलसाठी निवड
मल्हार पिक्चर्स कंपनीचे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. या चित्रपटातील गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.
‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी प्रियांका मयेकर यांनी सांभाळली आहे तर संकलन सागर शिंदे यांचे आहे. कला-प्रतीक रेडीज, वेशभूषा-हितेंद्र कापोपारा, रंगभूषा-केशभूषा-शैलेश केसकर, साहसदृश्ये-बब्बू खन्ना, नृत्य दिग्दर्शक-विष्णु देवा, किरण बोरकर, ध्वनिमुद्रन-निखिल लांजेकर यांनी केले आहे. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए .फिल्म्स सांभाळत आहे. ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट नववर्षात म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.