Shri Kshetra Devgad : नेवासा: तालुक्यातील भू-लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या गुरुदेव दत्तपीठ देवगड (Shri Kshetra Devgad) येथे शनिवारी सायंकाळी ६ वाजता भगवान दत्तात्रयांचा जन्म सोहळा गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज (Bhaskargiri Maharaj) यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. दत्तजयंती महोत्सवाच्या कालावधीत लाखो भाविकांनी देवगड येथे हजेरी लावून भगवान दत्तात्रयांचे (Dattatreya) दर्शन घेतले.
नक्की वाचा : भैरवनाथ देवस्थानच्या अन्नछत्रासाठी फिरोदिया कुटुंबियांकडून मोठी मदत
महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीचे पूजन
दत्तजयंतीच्या दिवशी शनिवारी सायंकाळी ६ वाजता झालेल्या श्री दत्त जन्म सोहळयाच्या प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. श्री दत्त जन्म सोहळयाच्या प्रसंगी मंदिरासमोरील कीर्तन मंडपात पुष्पांनी सजविलेल्या व्यासपीठावर पाळणा ठेवण्यात आला होता. पाळण्यामध्ये भगवान दत्तात्रयांची मूर्ती ठेवण्यात आली होती. विधिवत पूजन झाल्यानंतर वेदमंत्राच्या जयघोष पुष्पवृष्टी करत भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गुरुवर्य भास्करगिरी बाबा व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली. नेवासा येथील गायिका माधुरी कुलकर्णी यांनी दत्त जन्माचा पाळणा म्हटला. दत्तजयंती निमित्ताने पहाटे ४ च्या सुमारास गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी बाबा व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आला.अभिषेक प्रसंगी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न ग्रामपुरोहित शरदगुरू काटकर, भेंडे येथील आचार्य गणेशदेवा कुलकर्णी आदी ब्रम्हवृंद मंडळींनी केले.
अवश्य वाचा : जिद्द, चिकाटी व मेहनतीने यशाचे शिखर गाठता येते – संग्राम जगताप
संत महंत वारकरी भाविक मोठ्या संख्येने सहभागी (Shri Kshetra Devgad)
दत्तजयंतीच्या निमित्ताने सकाळी श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पालखीची मंदिर प्रांगणात प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या समवेत संत महंत वारकरी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात भागवत धर्माची पताका घेतलेले वारकरी, टाळ मृदृंगाचा गजर करणारे भजनी सेवेकरी सर्व भाविकांचे आकर्षण ठरले होते.
दुपारच्या सत्रात ब्रम्हवृंद मंडळींच्या उपस्थितीत पाच दिवस येथील यज्ञ मंडपात चाललेल्या श्री दत्त यागाची गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांसह स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजेने पूर्णाहुती देऊन सांगता करण्यात आली. यावेळी दत्त यागाचे पौरोहित्य करणाऱ्या सर्व ब्रम्हवृंद मंडळींचा पाची पोषाख देऊन सत्कार करण्यात आला. दत्त यागामध्ये स्थापित केलेल्या भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीची ब्रम्हवृंद मंडळींच्या उपस्थितीत वाजत गाजत प्रवरा नदी तीरावर नेण्यात आले. तेथे अवधूत स्नानाचा धार्मिक विधी वेदमंत्राच्या जयघोषात पार पडला. दत्तजयंती निमित्त पहाटे पासूनच गर्दीचा ओघ मोठ्या प्रमाणात दिसून आला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दर्शन बारीत उभे राहून भगवान दत्तात्रयांचा नामघोष करत भगवान दत्तात्रयांसह किसनगिरी बाबा समाधी मंदिर, पंचमुखी सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी गुरुवर्य महंत श्री भास्करगिरीजी बाबा व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्तांशी सुसंवाद साधत हसतमुखाने स्वागत केले.
श्री दत्त जन्म सोहळयाच्या प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरीजी बाबाजींच्या मातोश्री सरुआई पाटील व स्वामींच्या मातोश्री मीराबाई मते पाटील, महंत कैलासगिरीजी महाराज, महंत ऋषिनाथजी महाराज, विश्व हिंदू परिषदेचे आप्पासाहेब बारगजे, डॉ. जनार्धन मेटे महाराज, नेवासा विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, रत्नमाला लंघे, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे, संतोष माने, पंचगंगा सिड्सचे संचालक काकासाहेब शिंदे, विश्व हिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष डॉ.अविनाश काळे, किशोर जोजार, प्रदीप ढोकणे, विमा अधिकारी किशोर गारुळे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, देवगड सुरक्षाधिकारी भाऊ नांगरे यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते.
भगवान दत्तात्रयांचा जन्म सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर उपस्थित भाविकांना मंदिर परिसरात असलेल्या मैदानात पिठले भाकरी प्रसादाचे वाटप करण्यात आले. दत्तजयंतीच्या निमित्ताने मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली होती. या यात्रेमध्ये विविध प्रकारची स्टॉल थाटण्यात आली होती. नेवासा पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीने नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व होमगार्ड दलाचे समादेशक बाळासाहेब देवखिळे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.