Shri Kshetra Madhi : पाथर्डी : मौनी अमावस्येनिमित्त (Mauni Amavasya) पाथर्डी तालुक्यासह परिसरातील श्री क्षेत्र मढी (Shri Kshetra Madhi) येथील कानिफनाथ महाराज, मायंबा येथील मच्छिंद्रनाथ महाराज (Machhindranath Maharaj) तसेच वृद्धेश्वर देवस्थान येथे नाथ भक्तांची प्रचंड गर्दी उसळली होती.“कानिफनाथ महाराज की जय”, “बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय”, “आदिनाथ भगवान की जय”, “अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त” अशा जयघोषाने मढी, मायंबा व वृद्धेश्वर येथील संपूर्ण परिसर दिवसभर दुमदुमून गेला होता.
सन २०२६ मधील पहिलीच विशेष मौनी अमावस्या असल्याने राज्याच्या विविध भागांतून लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. नाथ संप्रदायाची परंपरा असलेल्या या देवस्थानांवर दर अमावस्येला भाविकांची वारी भरते; मात्र मौनी अमावस्येला या यात्रेचे स्वरूप अत्यंत भव्य व अभूतपूर्व होते. पहाटेपासूनच मढी येथील कानिफनाथ महाराज, मायंबा येथील मच्छिंद्रनाथ महाराज व वृद्धेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा अधिक वाढल्याने मढी–मायंबा परिसरात वाहतूक व्यवस्था पूर्णतः विस्कळीत झाली होती. अवघ्या चार किलोमीटरच्या मढी ते मायंबा या अंतरासाठी भाविकांना तब्बल चार तासांचा वेळ लागत होता. चारचाकी व दुचाकी वाहनांची गर्दी झाल्याने तिसगाव–मढी, निवडुंगे–मढी, पाथर्डी–मढी, घाटशिरस–मढी तसेच मढी–मायंबा हे सर्व मार्ग पहाटेपासूनच वाहनांनी भरून गेले होते.
हे देखील वाचा: मुंबई महापालिका महापौर पदासाठी हालचालींना वेग;शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या संपर्कात
महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा
दरम्यान, राज्याच्या विविध भागांतून आलेल्या नाथ भक्तांनी कानिफनाथ व मच्छिंद्रनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचे श्रद्धेने दर्शन घेतले. श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान येथे पौष अमावस्या यात्रा उत्सव सुरू असल्याने मायंबा गडाकडे जाणाऱ्या भाविकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली होती. अहिल्यानगर–पाथर्डी राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पाथर्डी शहरासह निवडुंगे, तिसगाव, करंजी आदी प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी झाली होती. शनिवारी रात्री सुरू झालेली अमावस्या रविवारी उशिरा रात्रीपर्यंत असल्याने अनेक भाविकांनी मढी व मायंबा परिसरात मुक्काम केला होता. याशिवाय श्री क्षेत्र मोहटादेवी, धामणगाव येथील देवीच्या दर्शनालाही भाविकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.

अवश्य वाचा: तारकपूर येथील विराज कॉलनीत घरफोडी करणारा जेरबंद; १९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
चोरट्यांडून भाविकांच्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला (Shri Kshetra Madhi)
वाढलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी भाविकांच्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारल्याच्या घटना घडल्या. मढी येथील कानिफनाथ मंदिर परिसरात दर्शनासाठी झालेल्या गर्दीत दोन महिलांची मंगळसूत्रे चोरीस गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत.कुंरवडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील शांताबाई बबन अढारी (वय ७०) या कुटुंबीयांसह देवदर्शनासाठी मढी येथे आल्या होत्या. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मंदिरासमोरील गर्दीत त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मणी मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केले. याच वेळी रांजणगाव (ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील पंचफुला विठ्ठल मोरे (वय ४५) यांचे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्रही चोरीस गेले आहे.दरम्यान, विविध गावांतून आलेल्या नाथ भक्तांच्या दिंड्या, भजन-कीर्तन व अन्नदानाचे कार्यक्रम दिवसभर सुरू होते. मात्र भाविकांची संख्या प्रचंड असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक, पाणी, स्वच्छता व निवासाच्या सोयी अपुऱ्या पडल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे रात्रभर नाथ भक्तांची गर्दी दर्शनासाठी ओसंडून वाहत होती.



