
Shri Kshetra Mohata Devi Temple : पाथर्डी : श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थानच्या (Shri Kshetra Mohata Devi Temple) नवनियुक्त विश्वस्त मंडळाने (Board of Trustees) मंगळवारी (ता.२५) औपचारिकरित्या पदभार स्वीकारला. अहिल्यानगर जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे (Anju Shende) यांच्या आदेशानुसार नव्या मंडळाची नियुक्ती करण्यात आली. २४ नोव्हेंबर रोजी पूर्वीच्या मंडळाची मुदत संपल्यानंतर नव्या विश्वस्तांचा कार्यकाळ सुरू झाली. मोहोटादेवी संस्थांचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश महेश लोणे, दिवाणी न्यायाधीश तथा विश्वस्त रविकिरण सपाटे यांच्या उपस्थितीत श्री मोहटादेवीची प्रार्थना व पूजा करून विश्वस्तांनी पदभार स्वीकारला. देवस्थानच्या परंपरेला साजेशी साधेपणा आणि भक्तीभावाने ही प्रक्रिया पार पडली.
नक्की वाचा : मानवावर हल्ला करणारे २३ बिबटे जेरबंद; मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई
विश्वस्तांनी कार्यक्षमतेवर भर देण्याचे संकेत
पदभार स्वीकारल्यानंतर विश्वस्तांनी मनोगत व्यक्त करताना भाविक भक्तांसाठी अधिक प्रमाणात विविध सुविधा उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. दर्शनव्यवस्थेचे सुलभीकरण, स्वच्छता, निवास व्यवस्था, आरोग्य सुविधा, तसेच सण-उत्सवांच्या आयोजनात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेवर भर देण्याचे संकेत विश्वस्तांनी दिले. देवस्थानच्या आध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमांना गती देण्याची भूमिका या मंडळाने स्पष्ट केली. यापूर्वीच्या विश्वस्त मंडळाच्या कार्यकाळात मंदिर परिसरातील मूलभूत सुविधा, भक्तनिवास आणि व्यवस्थापनात सकारात्मक बदल झाल्याचा अनुभव भाविकांनी व्यक्त केला होता.
अवश्य वाचा : शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज द्या ; शेतकऱ्यांचे महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन
पारदर्शक कार्यपद्धतीची अपेक्षा (Shri Kshetra Mohata Devi Temple)
त्या पार्श्वभूमीवर नव्या विश्वस्तांकडून अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मोहटे गावातून बाबासाहेब दहिफळे, शुभम दहिफळे, शशिकांत दहिफळे, अशोक दहिफळे, राजेंद्र शिंदे तर भावीक भक्तप्रतिनिधी म्हणून ॲड. विक्रम वाडेकर, ॲड. कल्याण बडे, ॲड. प्रसन्न साहेबराव दराडे, श्रीकांत लाहोटी, ॲड. ऋतीका कराळे यांनी विश्वस्त म्हणून पदभार स्वीकारला. श्रीक्षेत्र मोहटादेवीला हजारो भावीक दरवर्षी भेट देत असल्याने नव्या विश्वस्त मंडळाकडे विकासाची मोठी जबाबदारी आहे. देवस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी सर्वांचे स्वागत केले. देवस्थानच्या चालू उपक्रमांबाबत आणि भावी नियोजनाबाबतही माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी भिमराव खाडे, लेखापाल संदीप घुले तसेच कर्मचारी उपस्थित होते.


