
Shri Kshetra Mohta Devi Trust : पाथर्डी : श्री क्षेत्र मोहटा देवी सार्वजनिक ट्रस्ट (Shri Kshetra Mohta Devi Trust) मंडळाच्या विश्वस्त पदाची प्रतिक्षित निवड अखेर जाहीर झाली असून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे (Anju Shende) यांनी २०२५-२८ या तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी नवी विश्वस्त यादी प्रसिद्ध केली आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या लढती निश्चित
मोहटे गावातील ५ व इतर गावांतील ५ अशा दहा विश्वस्तांची निवड
या निवडीसाठी एकूण ३९० अर्ज प्राप्त झाले होते. नियमांनुसार मोहटे गावातील पाच व इतर गावांतील पाच अशा दहा विश्वस्तांची निवड करण्यात आली आहे. ट्रस्टमध्ये एकूण १५ विश्वस्त असतात. त्यापैकी जिल्हा न्यायाधीश, उपवनसंरक्षक अधिकारी, पाथर्डीचे दिवाणी न्यायाधीश, तहसीलदार व गटविकास अधिकारी हे पदसिद्ध विश्वस्त आहेत. उर्वरित दहा विश्वस्तांची निवड दर तीन वर्षांनी केली जाते. राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मोहटादेवी हे माहूर देवीच्या साडेतीन शक्ती पिठांतील उपपीठ मानले जाते. चौसष्ट योगिनी, अष्ट भैरव व दशमहाविद्यांच्या मूर्ती तसेच श्रीयंत्राकार दर्शन रांग या वैशिष्ट्यांमुळे हे ठिकाण राज्यात अद्वितीय ठरते. दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सवात लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
अवश्य वाचा : पाथर्डीतील निवडणूक चित्र बदलले; १४ अर्ज मागे, तिरंगी लढतीचे संकेत
निवड झालेले विश्वस्त पुढील प्रमाणे (Shri Kshetra Mohta Devi Trust)
बाबासाहेब रघुनाथ दहिफळे, शुभम शामराव दहिफळे, शशिकांत रामनाथ दहिफळे, अशोक भगवान दहिफळे, राजेंद्र विठ्ठल शिंदे (मोहटे गावातील), विक्रम लक्ष्मणराव वाडेकर (अहिल्यानगर), अॅड. कल्याण दगडू बडे (छ. संभाजीनगर), प्रसन्न साहेबराव दराडे (पुणे), श्रीकांत शिवकरण लाहोटी (पाथर्डी), ऋतिका अशोक कराळे (सांगवी खुर्द, ता. पाथर्डी) नव्या विश्वस्त मंडळाकडून श्रद्धाळूंना सोयी सुविधा वाढविणे व देवस्थानाचा विकास साधण्यासाठी सकारात्मक उपक्रम राबविण्यात येतील, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. देवस्थानचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश-१ श्री. महेश लोणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही होत असून ही माहिती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली.


