Shrigonda : श्रीगोंदा : श्रीगोंदा (Shrigonda) विधानसभा मतदारसंघ हा राजकीय (Political) दृष्ट्या सजग राहणारा मतदारसंघ आहे. पहिल्यापासूनच या मतदारसंघात समाजवादी विचारसरणीला मतदारांनी झुकते माप दिले आहे. एकीकडे भीमा व दुसरीकडे घोडनदीने या तालुक्याचा अर्धा भाग सुजलाम सुफलाम केलाय. यातच विसापूर तलावही आहेच. त्यामुळे पाण्याबरोबरच सहकार (Cooperation) चळवळही वाढली. त्यातून राजकारणही पाणी व सहकार चळवळी भोवती फिरत राहिले आहे.
अवश्य वाचा: “६ नोव्हेंबरपासून राहुल गांधी, मी आणि उद्धव ठाकरे प्रचार सुरु करतोय” : शरद पवार
सहकार चळवळीतील दिग्गजांत राजकीय सत्तासंघर्ष
संत शेख मोहम्मद महाराज यांच्या या तालुक्यात हिंदू-मुस्लिम ऐक्य व वारकरी संप्रदाय हा वैचारिक पाया राहिला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही सहकार चळवळीतील दिग्गजांत राजकीय सत्तासंघर्ष पहायला मिळणार आहे. या तालुक्यात सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे यांनी सहकार चळवळ वाढीस लागण्यासाठी मोठे काम केले. ते या मतदारसंघाचे दोन वेळा आमदार होते. मात्र, १९८०पासून बबनराव पाचपुते यांनी या मतदारसंघात राजकीय अस्तित्व निर्माण केले. जनता दल, अपक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असा पक्षांतून राजकीय प्रवास करणाऱ्या पाचपुते यांनी ७ वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. मात्र, या मतदारसंघातील विकासाची पाटी अजूनही कोरी असल्याची भावना जनमानसात असल्याचे सांगितले जाते.
१९८० ते २०१४पर्यंत या मतदारसंघात नागवडे-पाचपुते संघर्ष (Shrigonda)
पाचपुतेंच्या उदयापासून नागवडे व पाचपुते सत्तासंघर्ष सुरू आहे. १९८० ते २०१४पर्यंत या मतदारसंघात नागवडे-पाचपुते संघर्ष विधानसभा निवडणुकीत पहायला मिळाला. यात शिवाजीराव नागवडे यांनी १९९९मध्ये पाचपुतेंना पराभूत केले होते. पाचपुते हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या खास मर्जीतील नेते होते. मात्र, २०१४मध्ये त्यांनी पवारांंची साथ सोडली आणि त्यांची राजकीय ग्रहदशा फिरली. पवारांनी राहुल जगताप यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी नागवडे यांनी जगतापांना पाठिंबा दिला. या जोरावर पाचपुते यांंचा पराभव झाला. मात्र, २०१९च्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली. घनश्याम शेलारांना शरद पवारांनी उमेदवारी दिली. शेलार व पाचपुतेंच्या संघर्षात पाचपुतेंचा निसटता विजय झाला खरा मात्र, बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी काकांसमोर आव्हान उभे केले. त्यामुळे पाचपुते घरातूनही अडचणीत आले. राजेंद्र नागवडे यांचा त्यांच्याच साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभव करण्याच्या नादात बबनराव पाचपुते यांनी राजकीय गणिते अधिकच गुंतागुंतीची केली. या निवडणुकीत नागवडे यांनी साखर कारखान्यातील सत्ता राखली. मात्र, बबनराव पाचपुतेंना त्यांच्या गावातील बाजारसमिती व ग्रामपंचायत मधील सत्ता गमवावी लागली.
नागवडे कारखाना निवडणुकीनंतर पुन्हा बबनराव पाचपुते व नागवडे कुटुंब यांच्यातील राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. नागवडे यांनी साजन पाचपुते यांच्या मदतीने काष्टी पट्ट्यात ताकद वाढवली आहे. यातच विधानसभा निवडणुकीत बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते यांचे कार्यकर्ते नाराज झाले. कुटुंबातील आणखी वाढती नाराजी पाहून पाचपुतेंनी ऐन वेळी प्रतिभा पाचपुते यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्याऐवजी त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींना गळ घालून विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने सुरुवातीला उपनेते साजन पाचपुते यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले होते, असे समजते. मात्र, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अनुराधा नागवडे याही निवडणूक लढवणार असल्याने मतांचे विभाजन नको, अशी भूमिका घेत साजन पाचपुते यांनी ठाकरे गटाचे तिकीट नागवडे यांना मिळवून दिले. त्यामुळे महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नागवडे यांचा मतदारसंघात सहकार व शैक्षणिक संस्थांच्या जोरावर गावोगावी कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे. यातच पाचपुतेंचा बालेकिल्ला असलेल्या काष्टीतून साजन पाचपुते यांचा आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्याने अनुराधा नागवडे यांची ताकद आणखी वाढली आहे.
नागवडे यांना तिकीट मिळाल्याने नाराज झालेल्या माजी आमदार राहुल जगताप यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. मात्र, तरीही आघाडीचा उमेदवार बदलला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. श्रीगोंद्यात आता तीन साखर कारखानदारांत सत्तासंघर्ष पहायला मिळत आहे. यातील पाचपुते व जगताप यांच्या साखर कारखान्यांवर आर्थिक बोजा वाढत असल्याचे सांगितले जाते. तर नागवडे यांचा कारखाना व प्रचार दोन्हीही जोमात असल्याची चर्चा आहे. त्यातच विखेंचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णा शेलार हे वंचितकडून लढत असल्याने यंदा विखेंची ताकद पाचपुतेंना मिळणार नाही. त्यामुळे या सत्तासंघर्षात नेमकं कोण बाजी मारणार हे २३ नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे.