Shrigonda News : श्रीगोंदा : जेव्हा गरिबी उंबरठ्यावर उभी असते, तेव्हा अनेक स्वप्ने (Dreams) कोमेजून जातात. पण काही जिद्दी जीव याच गरिबीला आपल्या यशाचे इंधन बनवतात. श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील सुरोडी येथील १८ वर्षीय निकिता सतीश दवणे हिने हेच सिद्ध करून दाखवले आहे. नुकत्याच झालेल्या वर्धा पोलीस भरतीत (Police Recruitment) निकिताने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत पोलीस दलात प्रवेश निश्चित केला आहे.
अवश्य वाचा : संगमनेरमध्ये रामजन्मोत्सव भक्तिमय वातावरणात
फॅब्रिकेशनचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह
निकिताचे कुटुंब अत्यंत कष्टकरी आहे. वडील फॅब्रिकेशनचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई गावात ‘आशासेविका’ म्हणून रात्रंदिवस आरोग्य सेवा देते. घरी केवळ दीड एकर कोरडवाहू शेती असून निसर्गाच्या लहरीपणावर कुटुंबाचे गुजराण होते. अशा हलाखीच्या परिस्थितीतही आई-वडिलांनी आपल्या गरजा बाजूला सारून निकिताच्या शिक्षणासाठी आणि खेळासाठी तिला बळ दिले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पाच वेळा राज्य स्तरावर प्रतिनिधित्व (Shrigonda News)
निकितामधील खेळाडूची ओळख पाचवीतच पटली होती. लांब उडी स्पर्धेत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर तिने पाच वेळा राज्य स्तरावर प्रतिनिधित्व केले. यात १ रौप्य आणि २ कांस्य पदके पटकावत तिने आपली क्षमता सिद्ध केली होती. बिहार येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठीही तिची निवड झाली होती. याच क्रीडा कौशल्याचा उपयोग तिला पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत झाला, जिथे तिने ५० पैकी ४८ गुणांची ‘परफेक्ट’ कामगिरी केली.
१२१ गुणांसह ती वर्धा जिल्ह्यात अव्वल
वयाचे १८ वे वर्ष पूर्ण होताच निकितासमोर पहिलीच पोलीस भरती आली. “एकच जागा आहे, कशाला फॉर्म भरतेस?” असे म्हणणारे अनेक होते. मात्र, अकॅडमीमधील सरांच्या मार्गदर्शनाखाली तिने स्वतःला झोकून दिले. अखेर ९२ उमेदवारांना मागे टाकत १२१ गुणांसह ती वर्धा जिल्ह्यात अव्वल ठरली. निकिताच्या या यशाबद्दल तिचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाजार समितीचे संचालक भास्कर वागस्कर, प्रमुख पाहुणे प्रशांत ओगले, बापूशेठ माने, गोवर्धन वागस्कर, संदीप वागस्कर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन वागस्कर, मीनाताई सकट, कचरू शेठ वागस्कर, भगवान वागस्कर, संतोष वागस्कर, सुमनताई चव्हाण यांनी तिचा सन्मान करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Table of Contents



