Shrirampur : श्रीरामपुरात काॅंग्रेसचा मजबूत गड कोण भेदणार 

Srirampur : श्रीरामपुरात काॅंग्रेसचा मजबूत गड कोण भेदणार 

0
Srirampur

नितीन शेळके

Shrirampur : श्रीरामपूर : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला श्रीरामपूर (Shrirampur) विधानसभा मतदारसंघ हा एखादं दुसरा अपवाद वगळता काँग्रेस (Congress) पक्षाचाच मजबूत गड राहिलेला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाच्या शिरस्त्याप्रमाणे विद्यमान आमदार लहू कानडे (MLA Lahu Kanade) यांनाच उमेदवारी मिळून त्यांच्या विरोधात महायुतीच्या शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पक्षाचे माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे हे निवडणूक रिंगणात दिसतील असे संकेत मिळत आहेत. परंतु आता शिंदे गटाकडून इच्छुकांच्या यादीत भाजप (BJP) किसान मोर्चाचे नितीन उदमले यांचे नाव आघाडीवर आले आहे. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, जितेंद्र तोरणे हेही इथून इच्छुक असून काँग्रेसकडून पक्षाचे सरचिटणीस हेमंत ओगले हे तर भाजपकडून नितीन दिनकर यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्नांची शिकस्त सुरू ठेवली आहे. याखेरीज आरपीआय, शेतकरी संघटना व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देखील विधानसभेच्या आखाड्यात दिसतील. दरम्यान, उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी ‘दुसऱ्या पक्षात जायची वेळ आली तरी चालेल परंतू यंदा थांबायचंच नाही’ अशी पक्की खूणगाठ इच्छुकांनी मनाशी मारलेली दिसत आहे.

अवश्य वाचा: पुण्यात दोन चिमुरड्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार

युतीच्या नेत्यांच्या अपेक्षा उंचावल्या (Shrirampur)

आतापर्यंत येथील मतदारांनी काँग्रेसलाच कौल दिलेला आहे. त्यांच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चित्र पालटून महायुतीचे उमेदवार असलेले सेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांना तालुक्यातुन सुमारे 11 हजार 800 मतांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे साहजिकच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत युतीच्या नेत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यादृष्टीने शिवसेना शिंदे गट, भाजपा व राष्ट्रवादी अजित पवार गट कामाला लागले आहेत. युतीच्या जागावाटपात ही जागा सेनेच्या वाट्याला आहे. असे असले तरी भाजपसह राष्ट्रवादीनेही मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इतके सहजपणे ही जागा इतर कुणासाठीही सोडतील, असे वाटत नाही.

नक्की वाचा: दुर्गामाता दौडीत नारीलाच नाकारले,संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

रिपाइं, वंचितही निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत (Shrirampur)

तसेच रिपाइं, वंचित बहुजन आघाडीही निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. श्रीरामपूरवर रिपाईचा हक्क असून ही जागा काहीही झाले तरी लढणारच, असा इशारा नुकताच रिपाइंकडून देण्यात आला आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघावर स्व. गोविंदराव आदिक, स्व.जयंतराव ससाणे, माजी आमदार भानुदास मुरकुटे व सध्याचे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची मजबूत पकड राहिलेली आहे. या सर्व नेतेमंडळींची आपली स्वतःची हक्काची ‘व्होट बँक’ तालुक्यात आहे. कोणीही इच्छुक असला तरी यांच्या ‘आशीर्वादा’शिवाय श्रीरामपूरचे राजकारण पुढे सरकत नाही.

ही जागा शिंदे सेनेच्या कोट्यात असल्याने शिंदे गटाकडून इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यात माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांचे नाव अग्रक्रमाने आहे. आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यासाठी ते विविध उपक्रम व योजना राबवताना दिसत आहेत. अलिकडेच शिंदे गटाकडून नितीन उदमले यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांना वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्याने त्यांनी श्रीरामपूरात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. प्रदेश पातळीवरील नेत्यांचा आपल्या नावाला हिरवा कंदील असल्याचे ते सांगत आहेत. भाजपा किसान मोर्चाच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. त्यांच्या एंट्रीने युतीच्या इतर इच्छुकांची मात्र धाकधूक वाढली आहे. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे आपल्याला मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द दिल्याचे सांगतात. दुसरे इच्छुक उद्योजक जितेंद्र तोरणे यांचाही तालुक्यात दांडगा जनसंपर्क असून शहरातील विविध कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असतो. त्यामुळे आता महायुती श्रीरामपूरात कुठला उमेदवार देणार याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत.


भाजपला ही जागा सुटल्यास नितीन दिनकर यांच्या नावाची चर्चा आहे. मिलिंदकुमार साळवे हेही आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या बाजूला हिंदुत्ववादी कार्यकर्तेही आपला उमेदवार देण्यासाठी आग्रही आहेत. आमदार नितेश राणे यांनी नुकतीच रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ सभा घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. त्यांना स्थानिक वातावरण व राजकिय परिस्थितीचा फायदा होताना दिसत आहे. लोकसभेला लोखंडे यांना मिळालेले मताधिक्य हे हिंदुत्ववादी विचारांना मानणाऱ्या मतदारांचे आहे, असाही एक मतप्रवाह तालुक्यात दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील विधानभेसाठी कंबर कसली आहे. सरचिटणीस अविनाश आदिक व माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक सध्या युतीत आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तर ही जागा आपल्याकडे घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार देऊ, असे आश्वासन त्यांच्या समक्ष कार्यकर्त्यांना दिलेले आहे.

जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले यांनी शेतकरी युवक संवाद यात्रा काढून मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांना हात घातला. हे करताना इच्छुक ओगले यांनी स्वपक्षाच्याच आमदार कानडे यांच्यावर अनेक आरोप करत त्यांच्या विरोधात आंदोलने देखील केली आहेत. काँग्रेसचा हक्काचा मतदार मात्र या सर्व घडामोडींमुळे बुचकळ्यात पडला आहे. मतदारसंघात स्व. ससाणे यांना माणनारा मोठा वर्ग आहे. ससाणे समर्थक विधानसभेला नेमकं कुणाच्या पाठीशी उभे राहतात, हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे.ओगले यांनीही ‘सर्व पर्याय’ खुले ठेवल्याचे सांगितले आहे. दरम्यान, मतदारसंघात आपण केलेली कामे जनतेसमोर आहेत. या कामाच्या शिदोरीवरच आपण निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे आमदार लहू कानडे यांनी म्हटले आहे.अजून अधिकृत घोषणा व्हायची असली तरी ते ‘एकला चलो रे’ म्हणत कामाला लागले आहेत. २०१४ च्या निवडणुकीत पराभूत झालेले आमदार कानडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारली होती.


शेतकरी संघटनाही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आपला स्थानिक उमेदवार देणार आहेत. राज्य उपाध्यक्ष अजित काळे यांनी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफी, दूध दर आंदोलन,अकारीपडिक जमिनींचा प्रश्न सोडवण्यावर भर दिल्याने संघटनेबाबत सर्वसामान्य शेतकरी वर्गात आत्मीयतेची भावना आहे. एकंदर इच्छुकांप्रमाणेच विविध समस्या आणि प्रश्नांची भाऊगर्दी असलेला श्रीरामपूर मतदारसंघ सध्या राजकिय दृष्टया जिल्ह्यात हॉटस्पॉट ठरू लागला आहे.