नगर : रात्रीची वेळ, सामसूम रस्ता आणि घरासमोर अचानक लिंबू, सुया आणि अघोरी विद्येचे साहित्य दिसलं. ही एखादी हॉरर फिल्म नाही, तर एका सासऱ्याच्या घरासमोर स्वतःच्या जावयानेच केलेला (Black Magic) धक्कादायक प्रकार आहे. ही घटना श्रीरामपूर मधील (Shrirampur Black Magic Case) देवळाली प्रवरा येथे घडली आहे. नात्याला काळिमा फासणारा हा ‘जादूचा प्रयोग’ नेमका कशासाठी ? करण्यात आला तेच सविस्तर जाणून घेऊ…
नेमकं काय घडलं ? (Shrirampur Black Magic Case)
रात्री एक वाजता घरातील सगळे गाढ झोपलले असताना घराबाहेर काहीतरी हालचाली सुरू असल्याचा कानोसा एका कुटुंबाला लागला. बाहेर येऊन पाहिलं तर काय, काही व्यक्ती हे हळदी, कुंकू, गुलाल, टाचणी टोचलेले लिंबू, नायलॉन दोरी, कुऱ्हाड, एक गलोर अशा साहित्याची पूजा करत असल्याचे दिसले. हे पाहताच कुटुंबीयांनी आरडाओरडा केला. त्यामुळे हा जादूटोणा करणाऱ्यांनी पळ काढला. या कुटुंबाच्या हाती एक जण सापडला आणि उजेडात पाहतात तर काय, हा त्यांचा जावईच निघाला. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दिली. मात्र, जावयानेच घरासमोर काळ्या जादुचा प्रयोग केल्याची ही घटना श्रीरामपूर मधील,देवळाली प्रवरा येथे घडली आहे. या प्रकारामुळे संबंधित कुटूंब घाबरून गेल होत. मात्र यावेळी अनिसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांची ही भीती दूर केलीय.
नक्की वाचा: अतिवृष्टीत दगावलेल्या सर्वच पशुधनासाठी मिळणार मदत; नेमकी किती ?
आपल्या घरासमोर काळी जादू केली असून ती जावयानेच केली असल्याची तक्रार सासऱ्याने थेट पोलिसात दिलीय. गुरुवारी रात्री एकच्या सुमारास देवळाली प्रवरा येथील एका वस्तीवर तीन ते चार व्यक्ती आले. त्यांनी गेटचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला व घरासमोर लिंबू, हळदी -कुंकू, काळी बाहुली टाकून उंबऱ्याची पूजा केली. अंगणात देखील पूजा सुरू केली. याची खबर खोलीत झोपलेल्या कुटुंबाला लागताच ते खडबडून जागे झाले. त्यांनी दरवाजा उघडून पाहिला असता समोर तीन ते चार जण हळदी, कुंकू, गुलाल, टाचणी टोचलेले लिंबू त्याचबरोबर सोबत नायलॉन दोरी, कुऱ्हाड, एक गलोर असे साहित्याची पूजा करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी कुटुंबीयांनी आरडाओरड केली,तेव्हा ते चारही जण पळू लागले. त्यातील एका व्यक्तीला पकडण्यात कुटुंबीयाला यश आलं. त्यांनी जो व्यक्ती पकडला तो त्यांचाच जावई निघाला हे विशेष. त्यांनी त्याला पकडून ठेवले व पोलिसांच्या ताब्यात दिले.
अवश्य वाचा: आता झेडपी शाळेत प्रवेशावर मिळणार ‘ही’ मोठी सवलत
जावयाने असं कृत्य का केलं ? (Shrirampur Black Magic Case)
काही दिवसापूर्वी त्यांची विवाहित मुलगी मयत झाली होती व या कुटुंबीयांनी तिचा नवरा, सासू-सासरे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याचाच राग मनात धरून काही देवलशी बुवा बाबांना हाताशी धरून जावयाने त्यांच्या घरासमोर ही काळी जादू केल्याचा प्रकार घडला असावा, असा दाट संशय या कुटुंबाला आला. शिवाय त्यांच्या सोबत कुऱ्हाड ,नायलॉन दोरी, गलोल असल्यामुळे आमचा घातपात तर करायचा नव्हता ना, अशी शंका त्यांना आली. तो जावई फौजी असल्यामुळे आमच्या जीवाला धोका असल्याचे या कुटुंबीयांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांना सांगितले. या घटनेमागे जो कुणी बुवा बाबा असेल, ज्याने अशा प्रकारची पुजा करुन आम्हाला घालविण्याचा प्रयत्न केला, त्याचाही शोध घेवुन कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
ही घटना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यसचिव अॅड. रंजना गवांदे, अशोक गवांदे, माजी जिल्हा संघटक देविदास देसाई यांना समजताच ते तातडीने देवळाली प्रवरा येथे गेले. त्यांनी या भयग्रस्त कुटुंबाची भेट घेतली व त्यांच्या मनातील भीती दूर केली. याबाबत या कुटुंबाने राहुरी पोलिस स्टेशनला जाऊन संबंधित व्यक्ती विरोधात फिर्याद दिली आहे.



