Shubham Bitake : कर्जत : सध्या सर्वत्र प्रो कबड्डीचा (Pro Kabaddi) ज्वर सुरू असून १२ व्या हंगामात पटना पायरट्सच्या विरोधात बंगळुरू बुल्सच्या (Bengaluru Bulls) संघात बिटकेवाडी (ता.कर्जत) येथील शुभम बिटके (Shubham Bitake) या दादा पाटील महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांने आपली टीम ऑल आऊटच्या उंबरठ्यावर असताना एकाच विक्रमी रेडमध्ये पटनाचे तब्बल ६ गडी बाद करीत यासह अतिरिक्त १ बोनस घेत सात गुणांची रेड केली. कर्जत तालुक्यातील शुभमची ही रेड आजपर्यंतच्या प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वाधिक गुणांची रेड ठरली.
नक्की वाचा : प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत ११ नोव्हेंबरला; महापालिकेचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
सध्या पुण्याच्या क्रीडा शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सराव
कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी या ग्रामीण भागातील शुभम भाऊसाहेब बिटके या कबड्डी पटूने क्रीडा-विश्वातील सर्वांच्या नजरा आपल्याकडे केंद्रित केल्या. प्रगतशील शेतकरी आणि माजी सरपंच असलेल्या भाऊसाहेब बिटके यांचा शुभम मोठा मुलगा. त्याचे प्राथमिक शिक्षण बिटकेवाडीच्या जिल्हा परिषदेत झाले असून माध्यमिक शिक्षण कर्जतच्या रविशंकर विद्यामंदिरात पूर्ण झाले. शुभमने ११ वी दादा पाटील महाविद्यालयात पूर्ण केली. तर १२ वी त्याने त्रिमूर्ती शिक्षण संस्था नेवासात पूर्ण केली. सध्या तो एफवायच्या वर्गात शिक्षण घेत असून पुण्याच्या राकेश घुले या कबड्डी क्रीडा शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली.
अवश्य वाचा: दोन किलो सोने कारागिराने केले लंपास; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
सहा खेळाडूंच्या तावडीतून सुटत रेषेच्यापार (Shubham Bitake)
सध्या बंगळुरू बुल्स या संघाकडून खेळणाऱ्या शुभमने सोमवारी प्रो कबड्डीच्या चालू असलेल्या १२ व्या हंगामात पटना पायरेटसच्या विरोधात एलिमेनेटर मॅचमध्ये आपला संघ ऑल आऊटच्या छायेत असताना ऐतिहासिक रेड पार पाडली. कर्जतचा भूमिपुत्र असलेला शुभमने एकाच रेडमध्ये पटनाचे तब्बल सहा खेळाडू आणि एका अतिरिक्त बोनस गुणासह विक्रमी सात गुणांची रेड पूर्ण केली. सहा खेळाडूंच्या तावडीतून सुटत आपला हात मॅटवरील मध्यरेषेच्या पार केला असता बंगळुरू बुल्ससह इतर कबड्डी संघाचे लक्ष आपल्याकडे वेधले. गुणांकनात संघ मागे असताना शुभम बिटकेच्या या ऐतिहासिक रेडने बंगळुरू बुल्सचे आव्हान सामन्यात पुन्हा जीवंत केले होते. मात्र अंतिम क्षणी पुन्हा एकदा पटना पायरट्सने उत्तम खेळाचे प्रदर्शन करीत बंगळुरू बुल्सला ९ गुणांनी पराजीत केले. पटना या सामन्यात ४६ गुण कमावले तर बंगळुरू बुल्सने ३७ गुण प्राप्त केले होते.



