Snehalaya : स्नेहालयच्या समुपदेशकांची राळेगणसिद्धीला भेट

Snehalaya : स्नेहालयच्या समुपदेशकांची राळेगणसिद्धीला भेट

0
Snehalaya : स्नेहालयच्या समुपदेशकांची राळेगणसिद्धीला भेट
Snehalaya : स्नेहालयच्या समुपदेशकांची राळेगणसिद्धीला भेट

Snehalaya : पारनेर : बालविवाह (Child Marriage) ही समाजाला लागलेली मोठी कीड आहे. ती मुळापासून उपटून टाकण्यासाठी लोकचळवळ उभारणे गरजेचे आहे. पारनेर तालुक्यात स्नेहालय (Snehalaya) संस्था अहिल्यानगर यांच्या वतीने राबविण्यात येत असलेले ‘बालविवाह मुक्त तालुका’ अभियान कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी केले. राळेगणसिद्धी येथे स्नेहालय संस्थेच्या ‘उडान’ प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या समुपदेशकांनी अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी पारनेर तालुक्यात सुरू असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा अण्णांसमोर मांडला.

नक्की वाचा : एमसीएस व एमसीए अभ्यासक्रमासाठी अद्ययावत इमारत उभारणार : अरुण तनपुरे

मुलींच्या सर्वांगीण विकासावर भर

स्नेहालय संस्थेच्या वतीने बालविवाह प्रतिबंधासाठी ‘उडान’ हा विशेष प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून केवळ बालविवाह रोखणे एवढाच मर्यादित उद्देश नसून, तर त्या मुलींच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. भेटीदरम्यान उडान प्रकल्पाच्या समुपदेशक निशा वाघ आणि पत्रकार भगवान गायकवाड यांनी या अभियानाची सखोल माहिती दिली. या मोहिमेचे मुख्य पाच स्तंभ खालीलप्रमाणे आहेत.

अवश्य वाचा : मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार यांचा VSR विमानातून प्रवास

मुलींचे शिक्षण हाच ग्रामविकासाचा खरा पाया (Snehalaya)

ग्रामीण भागात बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगणे. कायद्याच्या मदतीने आणि समुपदेशनाने बालविवाह रोखणे. पीडित किंवा जोखीमग्रस्त मुलींच्या शिक्षणाची खंडित न होता सोय करणे. मुलींच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांना सुरक्षित वातावरण देणे. मुलींना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन पायावर उभे करणे. यावेळी अण्णा हजारे यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक करताना सांगितले की, “मुलींचे शिक्षण आणि स्वावलंबन हाच ग्रामविकासाचा खरा पाया आहे. बालविवाहामुळे एका मुलीचे आयुष्यच नव्हे, तर पुढची पिढीही अंधारात ढकलली जाते. स्नेहालय करत असलेले हे कार्य राष्ट्रनिर्मितीचे कार्य आहे.” त्यांनी या मोहिमेला आपले पूर्ण सहकार्य आणि शुभाशीर्वाद दिले.

तालुका बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प

यावेळी पारनेर तालुक्यातील बालविवाहाची सद्यस्थिती आणि प्रशासकीय पातळीवर मिळणारे सहकार्य यावरही चर्चा करण्यात आली. समाजाने अशा उपक्रमांत हिरीरीने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या भेटीमुळे ‘उडान’ प्रकल्पाच्या टीमला नवी ऊर्जा मिळाली. पारनेर तालुका लवकरच बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.