Snehalaya : पारनेर : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील कीर्तनकाराने अल्पवयीन मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) प्रकरणात समाजाला काळिमा फासणाऱ्या एका दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच,अहिल्यानगर येथील स्नेहालय (Snehalaya) संस्थेने तत्परता दाखवत पीडित अल्पवयीन बालिकेला मदतीचा हात दिला आहे. स्नेहालय संचलित स्नेहबाल आधार प्रकल्प (Snehbal Support Project) आणि उडान प्रकल्प यांनी या घटनेची तत्काळ दखल घेत पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला.संस्थेच्या प्रतिनिधींनी पीडितेच्या घरी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करून त्यांना कायदेशीर आणि मानसिक पाठबळ देण्याचे आश्वासन दिले.
नक्की वाचा : पारनेर महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ रथाचे स्वागत उत्साहात
सर्व सहकार्य करण्यासाठी संस्था कटीबद्ध
याप्रसंगी स्नेहालयच्या कार्यकर्त्या पूजा दहातोंडे, संज्योत बेल्हेकर आणि उडान प्रकल्पाचे सोशल वर्कर भगवान गायकवाड यांनी पीडित अल्पवयीन बालिकेशी अत्यंत संवेदनशीलपणे मानसिक आधार देत संवाद साधला. तिच्या मनातील भीती दूर करून तिला सुरक्षिततेची जाणीव करून दिली. या संवेदनशील प्रकरणात स्नेहालय संस्था पूर्णतः पीडित कुटुंबाच्या बाजूने उभी राहिली आहे. जोपर्यंत पीडितेस पूर्ण न्याय मिळत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. केवळ कायदेशीर मदतच नव्हे, तर पीडितेचे पुनर्वसन आणि तिला भविष्यात लागणारे सर्व सहकार्य करण्यासाठी संस्था कटीबद्ध आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
स्थानिक पोलिसांचा देखील सकारात्मक प्रतिसाद (Snehalaya)
पीडित बालिकेला नियमानुसार आता बाल कल्याण समिती (CWC) समोर हजर करण्यात येणार आहे. बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ही समिती पुढील दिशा ठरवेल. या संपूर्ण प्रक्रियेत स्थानिक पोलिसांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत मोलाचे सहकार्य केले आहे. पोलीस प्रशासन आणि स्नेहालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून पीडितेला न्याय मिळवून देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्नेहालयच्या या तत्परतेमुळे पीडित कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.



