Social Media : नगर : भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांच्याबाबत सोशल मीडियावर (Social Media) आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
नक्की वाचा : शिवजयंतीनिमित्त संगमनेर शहरात उत्सवाचे वातावरण; मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष
अनेक मतदारांना व्हॉईस कॉल
निवेदनात म्हटले की, स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा सर्वे करण्यात येत आहे. या सर्वेसाठी मोबाईल क्रमांकांचा वापर करण्यात आला आहे. या क्रमांकांवरून मतदारसंघातील अनेक मतदारांना व्हॉईस कॉल आले होते.
अवश्य वाचा : धक्कादायक! पाथर्डीत ४७ पैकी ३५ रक्त-लघवी तपासणी केंद्रे अनधिकृत
कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त (Social Media)
मात्र, या दोन्ही क्रमांकांच्या ट्रूकॉलर आयडीवर स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव तथा युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या नावाने अतिशय आक्षेपार्ह मजकूर टाईप करण्यात आला असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे स्व. आमदार कर्डिले यांच्यावर प्रेम करणाऱ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून यामुळे मतदारसंघातील कार्यकर्ते व नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
पोलीस विभागाने आवश्यक खबरदारी घ्यावी
स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यावर प्रेम करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत. या प्रकारामागील संबंधित व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच राहुरी, नगर व पाथर्डी तालुक्यातील गावागावातील वातावरण दूषित होणार नाही यासाठी पोलीस विभागाने आवश्यक खबरदारी घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन
दरम्यान, येत्या दोन दिवसांत संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई न केल्यास सोमवार (ता. ९ ) मार्च सकाळी १० वाजता डीएसपी चौक, अहिल्यानगर येथे तीव्र स्वरूपाचे रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी संदीप कर्डिले, गोविंद वाघ, रभाजी सुळ, अनिल कराडे, रावसाहेब कर्डिले, दत्ता तापकिरे, संभाजी पालवे, राहुल पानसरे, सागर बनकर, यशवंत पानमळकर, दादा दरेकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



