नगर : काँग्रेसच्या (Congress) माजी अध्यक्षा सोनिया गांधी या आता राजस्थान राज्यसभेची निवडणूक (Rajysabha Election) लढवणार आहेत. कारण काँग्रेसने राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात सोनिया गांधी यांचं पहिलं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासूनच सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. त्यावर आज काँग्रेसच्या यादीने शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे.
नक्की वाचा : मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यात बंदची हाक
काँग्रेसकडून आज राज्यसभेच्या चार उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये राजस्थानमधून सोनिया गांधी तर महाराष्ट्रात चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातून अभिषेक मनू सिंघवी आणि बिहारमधून अखिलेश प्रसाद सिंह हे उमेदवार असतील. सोनिया गांधी आज आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गेही उपस्थित असतील.
मनमोहन सिंह यांचा कार्यकाळ पूर्ण (Sonia Gandhi)
माजी मुख्यमंत्री मनमोहन सिंह यांची राजस्थानमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, यावेळी त्यांनी नकार दिल्याने मनमोहन सिंह यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ही जागा रिक्त होणार आहे. त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे काँग्रेसच्या या राखीव जागेवर निवडणुकीसाठी नवीन उमेदवार जाहीर करावा लागणार आहे. मात्र त्यासाठी सोनिया गांधी यांचे नाव सुचवण्यात आले आहे.
सोनिया गांधी या सध्या उत्तर प्रदेशमधील रायबरेलीच्या खासदार आहेत. सोनिया गांधींच्या रायबरेली मतदारसंघातून प्रियांका गांधी आगामी लोकसभा निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता आहे. याबाबत अद्याप कुठलीही घोषणा झालेली नाही. राजस्थानातील ३ जागांवर आणि हिमाचलमधील एका जागेवर राज्यसभेची निवडणूक होणार आहे. आता सोनिया गांधी यांनी राज्यसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी राजस्थानची जागा निवडली आहे.
१३ राज्यात वाजणार निवडणुकांचा बिगुल (Sonia Gandhi)
१३ राज्यातील ५६ राज्यसभा जागांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. तर, उर्वरित दोन जागांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश ३, बिहार ६, छत्तीसगड १, गुजरात ४, हरयाणा १, हिमाचल प्रदेश १, कर्नाटक ४, मध्य प्रदेश ५, महाराष्ट्र ६, तेलंगणा ३, उत्तर प्रदेश १०, उत्तराखड १, पश्चिम बंगाल ५, ओडिसा २, राजस्थान ३ अशा एकूण ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.