Sports Competition : पारनेर : अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या (Ahilyanagar ZP) वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत (Sports Competition), जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील हजारो खेळाडूंना मागे टाकत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रेनवडी येथील विद्यार्थ्यांनी उतुंग यश संपादन केले आहे. शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी उंच उडी (High Jump) क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत रेनवडी गावासह तालुक्याचे नाव जिल्हास्तरावर उंचावले आहे. कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर रेनवडी शाळेच्या खेळाडूंनी मैदानावर आपले वर्चस्व सिद्ध केले.
नक्की वाचा : पारनेरच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक करिअरची दारे उघडी
सुविधांपेक्षा इच्छाशक्ती महत्त्वाची
संकेत आनंदा पवार याने लहान गटातील ‘उंच उडी’ प्रकारात चमकदार कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. तर करण शुक्रराज पवार याने मोठ्या गटातील ‘उंच उडी’ प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. ग्रामीण भागात क्रीडा सुविधांची मर्यादित उपलब्धता असतानाही, या विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगला नाही. स्वतःची मेहनत, अफाट जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाने हे सिद्ध केले आहे की, सुविधांपेक्षा इच्छाशक्ती महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेचे क्रीडा शिक्षक सचिन गांगड सर आणि निलेश कवडे सर यांचे अथक परिश्रम आहेत. त्यांनी घेतलेल्या विशेष सरावामुळेच विद्यार्थ्यांना हे यश शक्य झाले.
अवश्य वाचा – पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेलेल्या नितीनची निर्घुण हत्या; दोन गट रुग्णालयातच भिडले
परिसरात आनंदाचे वातावरण (Sports Competition)
तसेच, मुख्याध्यापक मच्छिंद्रनाथ पावडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळ व्यवहारे सर आणि शुभांगी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मानसिक व शैक्षणिक पाठिंबा दिला.या यशासाठी केंद्रप्रमुख नारायण बाचकर आणि विस्तार अधिकारी सौ. जयश्री व्होरा यांनी वेळोवेळी भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन देत मोलाचे मार्गदर्शन केले. रेनवडी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या या जिल्हास्तरीय यशाबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण आहे. शाळा व्यवस्थापन समिती, पालक वर्ग, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



