Sports Competition : पाथर्डी : मर्यादित सुविधा, साधी साधने आणि ग्रामीण पार्श्वभूमी पण, जिद्द, नियोजन आणि शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन याच्या जोरावर पाथर्डी तालुक्यातील सोनोशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने (Zilla Parishad Primary School) संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासमोर क्रीडा क्षेत्रातील आदर्श निर्माण केला आहे. अहिल्यानगर जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत (Sports Competition) सोनोशी शाळेच्या मोठ्या गटातील मुलींच्या खो-खो (Kho-Kho) संघाने जिल्हा अजिंक्यपद पटकावत पाथर्डी तालुक्याचा गौरव उंचावला आहे. या स्पर्धेत पाथर्डी तालुक्याच्या संघांनी उल्लेखनीय कामगिरी केली. मुलांच्या मोठ्या गटातील संघाने पहिल्या फेरीत अटीतटीच्या लढतीत विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्यानंतर पारनेर तालुक्यातील कोहकडी शाळेच्या बलाढ्य संघाशी झालेला सामना रंगतदार ठरला. निर्धारित वेळेत सामना ५-५ असा बरोबरीत सुटला. अतिरिक्त वेळेतही ४-४ अशीच स्थिती कायम राहिली. अखेर कोहकडी संघाने बाजी मारली.
नक्की वाचा : बाल आनंद मेळाव्यात हजारोंची उलाढाल; १३० स्टॉल्समधून विद्यार्थ्यांनी साकारला ‘आनंद बाजार’
हे यश संघभावना व सातत्यपूर्ण सरावाचे फलित
पराभव स्वीकारावा लागला असला तरी पाथर्डीच्या खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, शिस्त आणि खेळभावना उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली.मुलांचा संघ उपांत्य फेरीत थांबला; मात्र मुलींच्या संघाने जबाबदारी खांद्यावर घेत उपांत्य व अंतिम सामन्यात एकतर्फी विजय मिळवत जिल्हा अजिंक्यपद निश्चित केले. अचूक डावपेच, चपळाई आणि एकजुटीच्या बळावर मिळवलेले हे यश संघभावना व सातत्यपूर्ण सरावाचे फलित असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, सोनोशी शाळेने यंदाच्या वर्षात तब्बल चार पारितोषिके पटकावले आहेत. लहान व मोठ्या गटातील मुलींच्या खो-खो संघांनी जिल्हा अजिंक्यपद मिळवले, तर लहान गट मुलांच्या खो-खो संघाने जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक पटकावला. तसेच वैयक्तिक लांब उडी प्रकारातही तृतीय क्रमांक मिळवत विद्यार्थ्यांनी सर्वांगीण कामगिरीची नोंद केली.
अवश्य वाचा : कोठला परिसरात गोळीबार करणारे दोघे जेरबंद बंद
शिक्षकांचे मार्गदर्शन आणि परिश्रम ठरले मोलाचे (Sports Competition)
या यशामागे शिक्षक अण्णासाहेब साळुंके, अमोल भंडारी तसेच मुख्याध्यापक देविदास बडे यांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि अथक परिश्रम मोलाचे ठरले. शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळेच हा विजय शक्य झाला. या ऐतिहासिक यशानंतर पाथर्डी तालुक्यातील शिक्षक बांधवांच्या वतीने सोनोशी शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड, विस्तार अधिकारी नीलेश शिरसागर तसेच पंचायत समिती पाथर्डीचे विषयतज्ञ बाबासाहेब वामन उपस्थित होते. शिक्षकांची एकजूट, नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण परिश्रम यामुळेच हा गौरव तालुक्याला मिळाला आहे असे शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड म्हणाले. या विजयामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्वगुण अधिक बळकट झाले आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळाली आहे असे विस्तार अधिकारी नीलेश शिरसागर यांनी सांगितले.



