नगर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (ST) ८७ हजार कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून १२४० कोटी रुपयांची रक्कम कपात करण्यात आली आहे. ही रक्कम एसटीने पी.एफ.ट्रस्टमध्ये (PF Investment) भरली नसल्याने गुंतवणुकीवरील अंदाजे १०० कोटी रुपये इतकी व्याजाची रक्कम बुडाली असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे (Shrirang Barge) यांनी दिली आहे.
नक्की वाचा : ‘एप्रिल मे ९९’मध्ये ‘जाई’ची एंट्री;यंदाची उन्हाळ्याची सुट्टी होणार अविस्मरणीय
एसटी कर्मचाऱ्यांना बसणार फटका (ST Employees PF)
एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ व ग्रॅज्युटीचे दोन स्वतंत्र ट्रस्ट आहेत. ८७ हजार एसटी कर्मचारी व अधिकारी यांच्या पीएफची अंदाजे १२४० कोटी रुपये व उपदान म्हणजे ग्रॅज्युटीची अंदाजे ११०५ कोटी रुपये इतकी रक्कम अशी मिळून अंदाजे २३४५ कोटी रुपयांची रक्कम फेब्रुवारी २०२४ पासून एसटीने दोन्ही ट्रस्टकडे भरणा केलेली नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली पी.एफ.ची ही रक्कम पीएफ ट्रस्टकडे भरणा केली जाते. त्यानंतर ट्रस्ट या रकमेची गुंतवणूक करते. त्यावरील येणाऱ्या व्याजातून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर रक्कम ८.२५ टक्के इतक्या दराने परत करण्यात येते. मात्र गेले अनेक महिने एसटीने या रकमेची गुंतवणूक केली नसल्याने त्यावरील व्याज व चक्रवाढ व्याज बुडाले आहे. त्यामुळे त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसणार आहे.
अवश्य वाचा : लाडकी बहीण योजना सुरु केली तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का ? -विजय वडेट्टीवार
इ.पी.एफ.ओ.ने ट्रस्टवर कारवाई केल्यास कर्मचाऱ्यांचे नुकसान (ST Employees PF)
संपानंतर शासनाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने कर्मचाऱ्यांच्या वेतनाला लागणारी पूर्ण रक्कम राज्य सरकारकडून एसटीला देण्यात येईल,असे शपथपत्र न्यायालयाला दिले आहे. मात्र त्यानंतर कधीही पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही. त्याचा परिणाम म्हणून पीएफ ट्रस्ट अडचणीत सापडली आहे. इ.पी. एफ. ओ. ऑफिसने काही नियम, अटी व शर्ती घालून या ट्रस्टला मान्यता दिली आहे. मात्र त्यांनी घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत आहे. इ.पी.एफ.ओ.ने ट्रस्टवर कारवाई केल्यास कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ शकते,अशी शंकाही बरगे यांनी व्यक्त केली आहे.
वर्षानुवर्षे पी. एफ.व ग्रॅज्युटी ह्या दोन्ही ट्रस्ट अत्यंत चागल्या प्रकारे चालल्या असून इ.पी.एफ.ओ.ऑफिस सुद्धा एसटीची ट्रस्ट ही सर्वात चांगली ट्रस्ट असल्याचे सांगत आहे. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे ह्या दोन्ही ट्रस्ट अडचणीत आलेल्या आहेत. सुदैवाने राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कडे एसटीच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. आता यापुढे तेच एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंब प्रमुख झालेत. त्यांनी या प्रकरणी लक्ष घालून ही रक्कम एसटीला व्याजासहित शासनाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे,अशी विनंतीही बरगे यांनी केली आहे.