
State Cooperative Marketing Federation : नगर : राज्य सहकारी पणन महासंघ (Maharashtra State Co-operative Marketing Federation), मुंबई (Mumbai) मार्फत हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने (Central Government) निश्चित केलेल्या अधारभूत किमतीनुसार भरडधान्य (मका, बाजरी, रागी, ज्वारी–मालदांडी व संकरित) खरेदी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी बी. आर. पाटील यांनी केले.
नक्की वाचा : मानवावर हल्ला करणारे २३ बिबटे जेरबंद; मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई
नजिकच्या खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करावी
शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी चालू हंगामात उत्पादित मका व बाजरीची नोंदणी नजिकच्या खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन करावी. नोंदणीसाठी ७/१२ व ८-अ उतारा, ७/१२ वर चालू हंगामातील पिकपेरा, आधारकार्ड, आधार-लिंक असलेले बँक पासबुक ही कागदपत्रे आवश्यक आहेत. नोंदणी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांचा लाईव्ह फोटो घेतला जाणार असल्यामुळे ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध नाही.
अवश्य वाचा : शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज द्या ; शेतकऱ्यांचे महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन
नोंदणी ३० नोव्हेंबर पर्यंत (State Cooperative Marketing Federation)
मकासाठी हमीभाव २ हजार ४०० रुपये, बाजरी २ हजार ७७५ रुपये, रागी ४ हजार ८८६ रुपये, ज्वारी–मालदांडी ३ हजार ७४९ रुपये तर ज्वारी–संकरित ३ हजार ६९९ रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आले आहेत. भरडधान्य नोंदणीचा कालावधी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत असून खरेदी कालावधी २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत राहणार आहे.
अहिल्यानगर तालुक्यात नोंदणी साईकृपा पणन सहकारी संस्था मर्यादित येथे सुरू आहे. श्रीगोंदा तालुक्यासाठी संभाजीराजे बहुउद्देशीय सहकारी संस्था, घुटेवाडी, सखूबाई विविध कार्यकारी सेवा सोसायटी, घोगरगाव आणि श्रीदत्तकृपा पणन सहकारी संस्था मर्यादित, घारगाव येथे व्यवस्था आहे. कर्जत तालुक्यासाठी अंध अपंग उद्योजक सेवाभावी संस्था, मिरजगाव, जामखेडसाठी चैतन्य कानिफनाथ कृषी व फळ प्रक्रिया सहकारी संस्था, खर्डा, शेवगावसाठी नाथकृपा बहुउद्देशीय सहकारी संस्था, बोधेगाव, पाथर्डी साठी अकोले परिसर सहकारी दूध उत्पादक संस्था, अकोले, कोपरगावसाठी बहादराबाद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, रांजणगाव देशमुख आणि संगमनेरसाठी किसान विकास कृषी प्रक्रिया सहकारी सोसायटी, पेमगिरी येथे नोंदणी व खरेदी सुरू आहे.
कृषी विभागाकडून प्राप्त पिकपेरा नोंदीनुसार केवळ बाजरी व मका या पिकांसाठी नोंदणी व खरेदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्या तालुक्यांत खरेदीदार संस्था नाहीत, त्या तालुक्यांना जवळच्या खरेदी केंद्रांशी जोडण्यात आले आहे. त्यानुसार अहिल्यानगर खरेदी केंद्र पारनेरशी, शेवगाव नेवासाशी, कोपरगाव राहाताशी, संगमनेर श्रीरामपूर–अकोलेशी तर पाथर्डी राहुरीशी जोडण्यात आले आहे.
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या नोंदणीतील मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे खरेदीसाठीची वेळ व तारखेची सूचना पाठविण्यात येईल. खरेदी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ऑनलाईन खरेदी पावती डाउनलोड करून जतन करावी, असेही जिल्हा पणन कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.


