Stormy Rain : कर्जत : येथे रविवारी (ता.२०) रात्री व सोमवारी (ता.२१) दुपारी वादळी वाऱ्यासह (Stormy Wind) विजेच्या कडकडाटात तुफान पाऊस (Stormy Rain) झाला. पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. यावेळी अनेक दुकानात पाणी घुसले होते. सखल भागातील अनेक रस्ते गुडघ्याभर पाण्याने भरले होते. सोमवारी आठवडे बाजाराच्या दिवशी झालेल्या पावसाने बाजारकरूचे मोठे हाल झाले. ढगफुटी सदृश झालेल्या पावसाने बाजरात विक्रीसाठी आणलेला भाजीपाला पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
नक्की वाचा: भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच राजकीय बंडाळ्या सुरू
विजेच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात
कर्जत शहर आणि परिसरात रविवारी रात्री ८ च्या सुमारास आणि सोमवारी दुपारी १२:३० वाजता वादळी वाऱ्यासह, विजेच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली. सोमवारी पडलेल्या ढगफुटी सदृश पावसाने तर आठवडे बाजारात आणि मुख्य रस्त्यावर हाहाकार माजवला. अनेक बाजारकरूंची दुकाने पाण्याखाली गेली. बाजारात विक्रीसाठी आणलेला भाजीपाला, इतर साहित्य पाण्यात वाहताना दिसली. सुमारे दीड तास झालेल्या तुफान पावसाने मुख्य रस्ता संपूर्ण पाण्याखाली गेला होता. तळमजल्यावरील अनेक दुकानात रस्त्याचे पाणी घुसले.
अवश्य वाचा: राज्यात आज पुन्हा जोरदार पावसाच्या सरी!’या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा
बसस्थानक परिसरात पाणीच पाणी (Stormy Rain)
बसस्थानक परिसरात रस्त्यावर पाण्याचे पाट वाहताना दिसले. यात वाहनांना वाट काढताना मोठी त्रेधातिरपीट उडाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकास नदीचे स्वरूप आले होते. जिल्हा परिषद मुलांची आणि मुलींची शाळेला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यातून वाट काढताना विद्यार्थ्यांचे नाकीनऊ आले होते. कर्जत – करमाळा रस्त्यावरील धांडेवाडी-नेटकेवाडी शिवारात वादळी वाऱ्याने मुख्य रस्त्यावरच झाड कोसळल्याने काही काळ रहदारी थांबली होती. तर रविवारी रात्री ९ ते पहाटे ३ पर्यंत वीज खंडित झाली होती. तसेच सोमवारी देखील बराच काळ शहराचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
शहरात डांबरीकरण रस्ता झाला. मात्र, त्या रस्त्यावर पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेज लाईनच न झाल्याने मोठा पाऊस झाला की मुख्य रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी होते. त्या पाण्यामुळे बहुतांशी दुकानात चांगलेच पाणी घुसते. यावर व्यापारी बांधवांचा रोष असला तरी ते प्रतिक्रिया देण्यास पुढे येत नाही. यासह दादा पाटील महाविद्यालयालगत रस्ता खाली आणि ड्रेनेज लाईनचे पाईप वर अशी परिस्थिती दिसते. त्या ठिकाणी देखील मोठा पाणीसाठा कायम दिसतो. वीरवस्तीच्या रस्ता दुभाजक ठिकाणी पाणी साचते. त्यात भरधाव वाहने गेल्यास पलीकडील बाजूस जाणाऱ्या वाहन धारकावर अनेक वेळा घाण पाणी उडल्याने वादंगाचे प्रसंग उभे राहिले आहे. यावर सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र चुप्पी साधते.