Sudhakar Borale : नगर : खरीप व रब्बी हंगामासाठी (Kharif crops) सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या पीक स्पर्धेमध्ये (Crop Competition) अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे (Sudhakar Borale) यांनी केले आहे.
नक्की वाचा : कॅनडात जगन्नाथ रथयात्रेवर फेकली अंडी;भारतीयांचा संताप
कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी मार्गदर्शन
राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेमध्ये वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पाकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात भर पडेल, या उद्देशाने राज्यांतर्गत या पीक स्पर्धा राबविण्यात येत आहेत.
अवश्य वाचा : अभिमानास्पद! छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश
एकूण १६ पिकांसाठी घेतली जाणार स्पर्धा (Sudhakar Borale)
सर्वसाधारण व आदिवासी गटसाठी तालुकास्तरावरील पीकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरुन राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत खरीप पीकासाठी ११ व रब्बी हंगामातील ५ अशा एकूण १६ पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार असून तालुका, जिल्हा व राज्य या तीन स्तरावर स्पर्धकांची निवड होणार आहे. तालुका पातळीवर पहिले बक्षीस ५ हजार रुपये, दुसरे ३ हजार तर तृतीय बक्षीस २ हजार रुपये एवढे आहे. जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस १० हजार रुपये, दुसरे ७ हजार तर तृतीय बक्षीस ५ हजार रुपये एवढे आहे. राज्य पातळीवर पहिले बक्षीस ५० हजार रुपये, दुसरे ४० हजार तर तृतीय बक्षीस ३० हजार रुपये एवढे आहे.
या पिकांचा आहे समावेश
खरीप पिकामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मुग, उडिद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफुल तर रब्बी पिकांमध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस या ५ पिकांचा समावेश आहे. खरीप हंगामातील मुग व उडीद पिकांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भूईमुग, सूर्यफुल पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२५ तर रब्बी हंगामातील ज्वारी, गहु, हरभरा, करडई, जवस पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ अशी आहे.