Sugarcane : श्रीरामपूर : तालुक्यातील भोकर शिवारात ऊस (Sugarcane) तोडणी सुरू असताना पहाटे थंडीपासून बचावासाठी ऊस तोडणी मजूरांनी (Sugarcane Harvesting Labor) पेटविलेल्या पाचरटाने दुपारनंतर पुन्हा पेट घेतल्याने दीड एकर ऊस जळाला असून लगत असलेल्या डाळींब बागेचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांत (Police) फिर्याद दाखल करणार असल्याचे डाळिंब उत्पादक शेतकऱ्याने सांगितले.
नक्की वाचा : ‘एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी’-रोहित पवार
थंडीपासून सुरक्षेसाठी पेटविलेल्या शेकोटीमुळे आग
ऊस जळाल्याचे समजताच अशोक कारखान्याने तातडीने ऊस तोडून नेला. सध्या सर्वत्र ऊस तोडीने जोर धरला त्याच बरोबर कालपर्यंत थंडीची जोराची लाट होती. या लाटेतून स्वतःचा बचाव करण्यासाठी ऊस तोडणी मजूर आदल्या दिवशी तोडलेल्या उसाचे पाचरट पेटवून उष्णता निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यातच येथील कमलबाई दाजीबा शिंदे यांच्या उसाची तोडणी सुरू होती. नेहमीप्रमाणे येथे ऊस तोडणी करत असलेल्या मजुरांनी पहाटेच उसाच्या थळात येवून आदल्या दिवशीचे पाचरट पेटवून गरजेपुरती ऊस तोडणी करून दुपारीच गाड्या भरून निघून गेले. मात्र, काही वेळाने वारा सुटला व त्यात शिल्लक असलेल्या विस्तवाने पेट घेतल्याची माहिती भोकर सोसायटीचे माजी चेअरमन सागर शिंदे यांनी दिली.
अवश्य वाचा : अवैध दारू विरोधात महिला आक्रमक; दुकान पेटवले
पेटलेल्या पाचरटामुळे उसाकडे गेली आग (Sugarcane)
दुपारच्या वेळी पेटलेल्या पाचरटामुळे उसाकडे आग गेली अन् उभ्या उसाने पेट घेतला. हा प्रकार येथील मजुराच्या लक्षात आला. त्यांनी लगेच सागर शिंदे यांच्याशी संपर्क साधला, यावेळी लगत असलेल्या शेतकऱ्यांनीही मदतीसाठी धाव घेतली. पण वाऱ्यामुळे ही आग विझविणे शक्य नव्हते. या आगीत शिंदे यांचा तोडणीला आलेला दिड एकर ऊस जळाला. पेटलेला ऊस विझविण्यासाठी आकाश शिंदे, शेजूळ, पांडुरंग पटारे, डॉ. गणेश शिंदे, सागर शिंदे आदींनी प्रयत्न केले. परंतु या आगीपुढे कुणाचेच काहीही चालले नाही. त्यामुळे काही वेळात दिड एकर ऊस जळाला. यात मजुरांच्या दुर्लक्षीतपणामुळेच हा ऊस जळाल्याची चर्चा परीसरात सुरू होती. या आगीमुळे उसाच्या क्षेत्रालगत कारभारी शिंदे यांची डाळिंब बाग होती. या आगीच्या तीव्रतेमुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्याचे जवळपास साठ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे कारभारी शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर याबाबत पोलिसांत फिर्याद देणार असल्याचे ही कारभारी शिंदे यांनी सांगीतले.