Suicide : पाथर्डी : शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजनांची (Government schemes) अपुरी अंमलबजावणी, कर्जमाफीतील जाचक अटी, बाजारात शेतमालाला मिळणारा अत्यल्प दर आणि नैसर्गिक आपत्तींवर ठोस उपाययोजना नसल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन अधिकच संकटात सापडले आहे. या धोरणात्मक अपयशाला कंटाळून कोळसांगवी येथील विठ्ठल भाऊसाहेब गाडे (वय ४५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची दुर्दैवी घटना घडली.
अवश्य वाचा: दहा दिवसांत बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा ‘पारनेर बंद’
अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
सततच्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पिकांचे उत्पादन हातचे गेले, तर दुसरीकडे वाढते कर्ज, बियाणे व खतांच्या गगनाला भिडलेल्या किमती आणि शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव यामुळे गाडे हे तीव्र मानसिक तणावाखाली होते. “शेतीसाठीचा खर्च वाढत असताना उत्पन्न मात्र वाढत नाही,” अशी भावना ते वारंवार व्यक्त करत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
नक्की वाचा : महायुती म्हणून महापालिका लढवण्याचा प्रयत्न : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
गुंतागुंतीच्या कागदपत्रांच्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी (Suicide)
कर्जमाफीसाठी सरकारने घातलेल्या कडक अटी व गुंतागुंतीच्या कागदपत्रांच्या प्रक्रियेमुळे कोणताही प्रत्यक्ष दिलासा मिळाला नसल्याची शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. ‘कर्जमुक्ती’ केवळ घोषणांपुरतीच मर्यादित राहिल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.
घटना घडली त्या वेळी घरात कोणीही उपस्थित नव्हते. आर्थिक विवंचना आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या अपुऱ्या मदतीमुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून राज्याच्या कृषी धोरणांवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “सरकार योजना जाहीर करते, मात्र लाभ कागदावरच राहतो. खत-बियाण्यांच्या महागाईने शेतकरी होरपळतो आणि मालाला भाव न मिळाल्याने तो संपतो. ही परिस्थिती बदलली नाही, तर आणखी किती शेतकरी बळी जाणार?” अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.



