Sujay Vikhe Patil : सुजय विखे पाटलांचे वक्तव्य आणि नगर उत्तरेचे राजकारण

Sujay Vikhe Patil : सुजय विखे पाटलांचे वक्तव्य आणि नगर उत्तरेचे राजकारण

0
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : नगर : नगर जिल्ह्यात नेहमीच पक्षापेक्षा गटातटाचे राजकारण (Politics) पहायला मिळते. यातही नातेगोते, हितसंबंध असे अनेक रेशमीधाग्यांची गुंतागुंत पाहयाला मिळते. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटलांनी (Sujay Vikhe Patil) दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणूक (Assembly Elections) लढवण्याची इच्छा जाहीर केली आणि नगर जिल्ह्यातील उत्तर भागाच्या राजकारणाला हादरे बसले. या हादऱ्यांची चर्चा राज्यभर झाली. यातून नगर जिल्ह्यातील राजकारणात नवी समीकरणे पहायला मिळण्याचे संकेत वर्तविले जाऊ लागले आहेत.

गणेश कारखाना ते विधानसभा

२०२३ वर्षांच्या मध्यात राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. या निवडणुकीने नगर जिल्ह्यातील राजकारणाचा नवा पायंडा तयार केला. विखे विरुद्ध सर्व असा सामना त्यात पहायला मिळाला. मुळात हा कारखाना कोल्हेंचा होता. मात्र, तो बंद पडल्यावर विखे गटाने तो चालवण्यासाठी घेतला होता. ही निवडणूक भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या गटाने भाजपचेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या गटा विरोधात लढविली. कोल्हे गटाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे तत्कालीन आमदार निलेश लंके, स्थानिक शिवसेना नेते यांनी पाठिंबा दिला. एवढेच नव्हेतर या निवडणुकीत प्रचारसभाही घेत विखेंवर टीका केली. या निवडणुकीत विखे गटाचा पराभव झाला.

अवश्य वाचा: स्वप्नील कुसाळेला कांस्यपदक,कसा आहे त्याचा प्रवास?

विखेंची कोंडी करण्याचा प्रयत्न (Sujay Vikhe Patil)

गणेश कारखाना निवडणुकीच्या विजयानंतर विखे गटाच्या विरोधात सर्वच पक्षांनी एकत्र येण्यास सुरूवात झाली. कधी नव्हे ते थोरात-कोल्हे-लंके-घोगरे हे सर्वच निवडणूक व मोठ्या कार्यक्रमांत एकत्रित दिसू लागले. यातून लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांना पाठबळ देण्यास सुरूवात झाली. मात्र, हे एकत्रित आले तरी तत्कालीन खासदार डॉ. सुजय विखे पाटील लोकसभा निवडणुकीबाबत निश्चिंत होते. त्यांनी आपल्या शिलेदारांच्या जीवावर निवडणुकीच्या प्रचाराची धुरा देऊन निश्चिंत होते. मात्र, विखे ज्यांच्या जीवावर निश्चिंत होते तेच विरोधी गटाबरोबर गेल्याची चर्चा आहे. भाजपचे आमदार राम शिंदे हे उघडपणे निलेश लंके यांच्या समवेत दिसले. लोकसभा निवडणुकीत भाजपचे काही नेते ऐनवेळी प्रचारापासून दूर राहिले. ज्यांच्यावर खूपच विश्वास ठेवला त्यांनीही लंकेंना मदत केल्याने डॉ. सुजय विखे पाटलांचा पराभव झाल्याचे सांगितले जाते. हे सलग दोन पराभव विखे गटाच्या चांगलेच जिव्हारी लागल्याची चर्चा आहे.

Sujay Vikhe Patil : सुजय विखे पाटलांचे वक्तव्य आणि नगर उत्तरेचे राजकारण
Sujay Vikhe Patil : सुजय विखे पाटलांचे वक्तव्य आणि नगर उत्तरेचे राजकारण

नक्की वाचा: मनोज जरांगेंना मोठा दिलासा! न्यायालयाकडून अटक वॉरंट रद्द

भाजप काँग्रेसच्या दिशेने

लोकसभा निवडणुकीत भाजप व त्याच्या मित्रपक्षांनी त्यांचेच उमेदवार पाडण्यात रस दाखविल्याची चर्चा आहे. यातून राज्यातील विद्यमान सात खासदार पराभूत झाल्याचे सांगितले जाते. त्यातील एक जागा अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील होती. पूर्वी राज्यात काँग्रेसचे शासन होते. विरोधीपक्षांची ताकद क्षीण होती. अशा वेळी काँग्रेसमध्ये दोन गट दिसून यायचे. हेच गट एकमेकांचे पाय खेचायचे. यातून पुढे काँग्रेसची शकले झाली. पुढे काँग्रेसची ताकद कमी होत गेली. त्यातून युतीची व पुढे महायुती सत्तेत येत गेली. विरोधात असलेला भाजप ताकदवर होत गेला. काँग्रेसची ताकद ठराविक नेत्यांपूर्तीच सीमित झाली. भाजपची ताकद वाढत गेली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशात पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी बसणार हे निश्चित वाटू लागल्याने भाजपमधील अंतर्गत मानापमानाचे राजकारण उघडपणे दिसू लागेल. त्याचा फायदा महायुतीने सोयिस्करपणे घेण्यास सुरुवात केली. विखे-पवार संघर्ष जुना आहे. यातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विखेंना कोंडीत पकडण्यासाठी आयती संधी चालून आली. कोल्हेंना २०१९च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढायचा आहे. थोरातांना विखेंचे जिल्ह्यातील प्रस्थ संपवायचे आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाला विखेंचा बदला हवा आहे. यातच भाजपचे जिल्ह्यातील काही नेते थेट विखेंना संपविण्याची खासगीत भाषा करत आहेत. विखे गटही पलटवार करू शकतो. यातून नगर जिल्ह्यात भाजपची वाटचाल काँग्रेसच्या दिशेने चालल्याचे दिसत असल्याची चर्चा आहे.

फडणवीसांची वक्रदृष्टी?

विखे पाटलांना भाजपचे आमदार राम शिंदे हे उघडपणे विरोध करत आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत शिंदेंचा पराभव विखे गटामुळे झाल्याचा आरोप त्यांनी करत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे यांनीही विखेंच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. मात्र, नंतरच्या काळात कर्डिले व मुरकुटे यांनी विखेंशी जुळवून घेतले. राम शिंदे यांचे खासदार निलेश लंके यांच्याशी असलेले सख्य सर्वश्रृत आहे. राम शिंदे हे फडणवीसांच्या मर्जीतील शिलेदार आहेत. विखे पाटील पिता-पुत्राचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी असलेले सख्य फडणवीसांना रुचत नसल्याने ते राम शिंदे व जिल्ह्यातील भाजप नेत्यांना विखेंच्या विरोधात पाठबळ देत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

Sujay Vikhe Patil : सुजय विखे पाटलांचे वक्तव्य आणि नगर उत्तरेचे राजकारण
Sujay Vikhe Patil : सुजय विखे पाटलांचे वक्तव्य आणि नगर उत्तरेचे राजकारण

दूध दर व मराठा आरक्षणाचा मुद्दा विरोधकांचे हत्यार

राज्यात मराठा आरक्षणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटीलही फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. राज्यातील भाजपने मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांच्या बचावासाठी भाजपतील मराठा आमदारांना पुढे केल्याची चर्चा आहे. यात राधाकृष्ण विखे पाटलांचाही समावेश आहे. त्यामुळे विखे हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात गोवले गेले आहेत. त्यातून ते मराठा आंदोलकांचे लक्ष्य ठरत आहेत. यातच दूध दरवाढीचा मुद्दा काढत विरोधकांनी विखे पाटलांना कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे. त्यादृष्टीने कोतूळमधून आंदोलनही सुरू आहे.

Sujay Vikhe Patil : सुजय विखे पाटलांचे वक्तव्य आणि नगर उत्तरेचे राजकारण
Sujay Vikhe Patil : सुजय विखे पाटलांचे वक्तव्य आणि नगर उत्तरेचे राजकारण

थोरातांना त्यांच्याच चक्रव्युहात अडकविण्याचा प्रयत्न

जिल्ह्यात विखेंविरुद्ध सर्व अशी स्थिती आणण्यात शरद पवार व बाळासाहेब थोरात हे दोघे असल्याची चर्चा आहे. ही कोंडी फोडायची असेल तर थोरातांना धक्का देण्याची तयारी विखेंनी सुरू केल्याची चर्चा आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून यंदा बाळासाहेब थोरात यांच्या ऐवजी त्यांंची कन्या जयश्री थोरात निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. तर बाळासाहेब थोरात हे सिन्नरमधून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. डॉ. सुजय विखे पाटलांच्या पराभवाचा बदला जयश्री थोरातांच्या पराभवाने घेण्याची चाचपणी विखे गटाकडून सुरू आहे. यातच राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविल्यास विजय मिळू शकतो, असे वाटल्याने माजी खासदार विखे पाटलांनी संगमनेर अथवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे थोरात त्यांच्या चक्रव्युहात अडकले काय? अशी चर्चा आहे.

कर्डिलेंचे वाढवले टेंशन

डॉ. सुजय विखे पाटलांनी राहुरीतून निवडणूक लढविल्यास भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे. कर्डिले दुसरा मतदारसंघ शोधत असल्याची चर्चा लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सुरू झाली होती. त्यात आता आणखी भर पडली आहे. कर्डिले यांना हक्काचा मतदारसंघ सोडून दुसरीकडून नशीब आजमावणे तेवढे सोपे ठरणार नसल्याचे सांगितले जात आहे.

Sujay Vikhe Patil : सुजय विखे पाटलांचे वक्तव्य आणि नगर उत्तरेचे राजकारण
Sujay Vikhe Patil : सुजय विखे पाटलांचे वक्तव्य आणि नगर उत्तरेचे राजकारण

विखे कोंडी फोडणार?

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विखे पिता-पुत्रांना बदलते राजकीय वातावरण कळले आहे. नवी राजकीय समीकरणे सोडविण्यासाठी नवी सूत्रे यांनी गोवायला सुरूवात केल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्यातून दिसू लागले आहे. यंदाची विधानसभा निवडणुकीत विखेच्या विरोधकांना कोंडीत पकडण्याची तयारी विखे गटाकडून सुरू झाल्याचे या वक्तव्यातून दिसत आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील हेच पुन्हा भाजपकडून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. मात्र, राहाता येथील भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी तीन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन विखे पाटलांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. पिपाडा हे विखे गटाचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. विखेंचे राजकारण पक्ष व नेत्यापेक्षा मतदारांभोवती फिरते. त्यादृष्टीने विखे पाटलांनी शिर्डी एमआयडीसीत डिफेन्स क्लस्टर मंजूर करून आणले आहे. यातून दोन हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे. शिवाय विखे कुटुंबाने राहाता तालुक्यात सहकाराचे जाळे घट्ट विनलेले आहे. त्यातून हक्काचा मतदार त्यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील आगामी विधानसभा निवडणूक चुरशीची आणि राजकीय सत्तासंघर्षाची ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here