Sujit Zaware नगर : पारनेर तालुका हा समाजवाद व साम्यवादी विचारसरणीचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, शिवसेनेने माजी आमदार विजय (Vijay Auti) औटींच्या रुपाने या तालुक्यातील राजकारण बदललं. २०१९मध्ये विजय औटींच्या पराभवानंतर तालुक्यातील राजकारण पुन्हा समाजवाद व साम्यवादाच्या छायेत आले. हे बदललेले समीकरण पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटाच्या गळाला तालुक्यातील मोठा मोहरा लागलायं. पारनेर तालुक्यातील राजकारणात काय घडतय. चला जाणून घेऊ…
पारनेर तालुक्यात काँग्रेस, भाकप व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नेहमीच वरचढ ठरायचे. मात्र, या राजकीय समीकरणाला पहिला छेद बसला तो माजी आमदार विजय औटींच्या रुपाने. २००४ ते २०१९ या कालावधीत पारनेर हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनला होता. मात्र, पठारी भागात त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. भाकपचे आझाद ठुबे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुजित झावरे (Sujit Zaware) यांनी आपला गड कायम ठेवला होता. २०१९मध्ये निलेश लंके यांनी शिवबंध तोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अन् शिवसेनेला पहिला मोठा धक्का बसला. त्याच वर्षी निलेश लंके यांनी विधानसभा निवडणुकीत विजय औटींना पराभवाचा धक्का दिला आणि शिवसेनेची ताकद कमी होऊ लागली. यातच शिवसेनेचे दोन भाग झाले.
२०२४च्या निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काशिनाथ दाते यांनी शिवसेना सोडत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेची उर्वरित ताकदही कमी झाली. यातच शिवसेना दोन गटात विभागली गेली. डॉ. श्रीकांत पठारे, रामदास भोसले, विकास रोहकले यांच्या सारखे काही शिलेदार उरले मात्र, तेही दोन गटात विभागले गेले. या दोन गटातील ठाकरे गटात माजी आमदार विजय औटी असल्याने या गटाची ताकद जाणवत राहिली.

अवश्य वाचा: युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा जाहीर पक्षप्रवेश
मात्र, शिंदे गटाकडे विकास रोहकले हे तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. तर ठाकरे गटाकडे डॉ. श्रीकांत पठारे तालुकाध्यक्ष आहेत. आता शिंदे गटाकडे मोठा राजकीय मोहरा आल्याची चर्चा आहे. दिवंगत माजी आमदार वसंतराव झावरे यांचे चिरंजीव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ६ नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाला मोठी ताकद मिळत असल्याची चर्चा आहे. मात्र, सुजित झावरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट व भाजप असा राजकीय पक्षांतराचा प्रवासही केला आहे. खासदार निलेश लंके यांचे ते राजकीय विरोधक समजले जातात. पारनेर तालुक्यात त्यांची चांगली ताकद आहे. सुजित झावरे यांच्या शिंदे गटातील पक्ष प्रवेशामुळे पारनेर तालुक्यातील राजकीय पटलावर शिंदे गटही आपले मोहरे उतरवत आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असल्याची चर्चा आहे.
नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप झाले संतप्त; स्वच्छता निरीक्षकांची घेतली झाडाझडती
कोण आहेत सुजित झावरे (Sujit Zaware)
पारनेरचे दिवंगत आमदार वसंतराव झावरे यांचे सुजित झावरे चिरंजिव आहेत. वसंतराव झावरेंच्या निधनानंतर सुजित झावरे यांनी त्यांचा वारसा पुढे चालवला. वासुंदे, टाकळी ढोकेश्वर परिसरात त्यांनी स्वतःचे वर्चस्व कायम ठेवले. वसंतराव झावरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते निष्ठावान समजले जात. मात्र, सुजित झावरे यांनी निष्ठा बदलत राहणे पसंत केले. कधी शरद पवार तर कधी अजित पवार मधेच विखे गटाशी जवळीक करत त्यांनी सोयीस्कर राजकारण केल्याची टीका त्यांच्यावर विरोधक करत असतात. त्यांनी राष्ट्रवादीचे दोन्ही गट व भाजपमध्येही काहीकाळ घालवला.
आता ते पहिल्यांदाच शिवसेनेत जात आहेत. ते शिंदे गटात जाणे त्यांनी पसंत केले आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाची ताकद पारनेर तालुक्यातील पठारी भागात कमी होती. यातच काशिनाथ दाते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केल्याने तीही ताकद कमी झाली आहे. याच पट्ट्यातील भाळवणी परिसरात शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष विकास रोहकले यांची ताकद आहे. त्यांच्या मातोश्री लिलाबाई रोहकले या भाळवणीच्या सरपंच आहेत. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी याच गटातून नशिब आजमावून पाहिले होते. त्यामुळे निलेश लंके समर्थकांची स्थिती व परिसरातील राजकीय परिस्थिती पाहता यांनी शिंदे गटात प्रवेश करणे पसंत केल्याची चर्चा आहे.



