
नगर : राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनाला आज शनिवारी दोन महिने पूर्ण झाले (Two Months Since the Passing)आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभरातून अजितदादांना श्रद्धांजली वाहिली जात आहेत. त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत अजितदादांच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Deputy Chief Minister Sunetra Pawar) यांनीही आज अजित दादांसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. ‘तुमच्या अनुपस्थितीत झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. ती जाणीव मनाला कायम टोचत राहते’, अशा शब्दात त्यांनी मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
नक्की वाचा: सहा वर्षाच्या मणिकर्णिकाची ‘केदारकंठ’ शिखराला गवसणी
सुनेत्रा पवार यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय ? (Sunetra Pawar on Ajit Pawar)
दादा,
आज तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले आहे. प्रत्येक क्षणी तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते आणि त्याचवेळी दैनंदिन राजकीय व सामाजिक कामकाजात तुमचे अस्तित्वही जाणवत राहते.
तुमच्यातील लोकाभिमुख – विकासाभिमुख व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांशी असलेली जिव्हाळ्याची नाळ, कामासाठीची झपाटलेली वृत्ती आणि प्रत्येक निर्णयामागची दूरदृष्टी हे सगळेच मला कायम मार्गदर्शन करण्याचे काम करतील. तुम्ही केवळ एक नेते नव्हता, तर असंख्य लोकांच्या आयुष्यात विश्वास, बळ आणि आशा निर्माण करणारे आधारस्तंभ होता. तुमच्यामुळे अनेकांना दिशा मिळाली, संधी मिळाली आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद मिळाली.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराची वाटचाल तुमच्या प्रेरणेनेच अखंड सुरू आहे. लोककल्याणासाठी निर्णय घेताना या परिस्थितीत तुम्ही काय केले असते, हा विचार मनात ठेवून मी प्रत्येक पाऊल उचलण्याचा प्रयत्न करते.
अवश्य वाचा: राज्यात वीज स्वस्त होणार; प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?
तुमच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, ही जाणीव मनाला कायम टोचत राहते. पण तुम्ही दिलेली शिकवण, तुमचे विचार आणि तुमचा वारसा हेच आता पुढचा मार्ग उजळवणारे दीप आहेत. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक आठवण मनात कायमची कोरलेली आहे. तुमच्या शब्दांमधील ताकद मला उभे राहण्याची ऊर्जा देते.
दादा, तुमची उणीव शब्दांत मांडणे अशक्य आहे. पण तुमची स्वप्ने, तुमचे कार्य आणि तुमचे विचार पुढे नेण्याचा निर्धार मी कायम मनाशी जपेन. तुम्ही दाखवलेली दिशा आणि दिलेली मूल्ये हीच आमची प्रेरणा आणि मार्गदर्शक राहतील.


