नगर : अमेरिकेची जगविख्यात अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासामधील (NASA) प्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Astronaut Sunita Williams) या २७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त (Retired) झाल्या आहेत. भारतीय वंशाच्या अंतराळवीर असलेल्या विल्यम्स यांची निवृत्ती २७ डिसेंबर २०२५ पासून लागू झाली आहे. सुनीता विल्यम्स यांनी आपल्या दीर्घ कारकीर्दीमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर तीन मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करत अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत.
६०८ दिवस अंतराळात वास्तव्य केलेली अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams Retired)
सुनीता विल्यम्स यांच्या यशस्वी कारकिर्दी बाबत नासाने दिलेल्या माहितीनुसार, सुनीता विल्यम्स यांनी एकूण ६०८ दिवस अंतराळात वास्तव्य केले आहे. याशिवाय सुनिता विल्यम्स यांनी एकूण ९ वेळा स्पेसवॉक केला आहे. त्याचा एकूण कालावधी ६२ तास ६ मिनिटे एवढा आहे. कुठल्याही महिला अंतराळवीराने स्पेसवॉकमध्ये केलेला हा सर्वाधिक कालावधी आहे. तर एकूण स्पेसवॉकच्या यादीत सुनीता विल्यम्स चौथ्या क्रमांकावर आहेत.
नक्की वाचा: मुंबईत बिहार भवन उभं राहणार! त्यासाठी कायदा काय सांगतोय?
नासाचे प्रशासक जेरेड आयझेकमेन यांनी सांगितले की, सुनीता विल्यम्स या मानव अंतराळ उड्डाणामध्ये अग्रेसर राहिल्या. तसेच त्यांनी अंतराळ स्थानकामध्ये आपल्या नेतृत्वामधून भविष्यातील मोहिमांची पायाभरणी केली. त्यांच्या योगदानामुळे चंद्रासाठी आर्टेमिस मोहीम आणि भविष्यातील मंगळ ग्रहांकडे आगेकूच करण्याचा मार्ग सोपा झाला आहे. निवृत्त होण्यापूर्वी सुनीता विल्यम्स या नासाचा सर्वात वरिष्ठ वेतनश्रेणी स्तर असलेल्या जीएस-१५ मध्ये कार्यरत होत्या.
नासाच्या फेडरल एम्प्लॉईज रिटायरमेंट सिस्टिम अंतर्गत पेन्शन मिळणार (Sunita Williams Retired)
विल्यम्स या स्तरावर असताना त्यांना दरवर्षी सुमारे १ कोटी २० लाख ते १ कोटी ३० लाख रुपये एवढं वेतन मिळत असे. याशिवाय मोहिमेचे भत्ते, संशोधनाची सुविधा आणि इतर सरकारी लाभही मिळत होते.आता निवृत्त झाल्यानंतर सुनीता विल्यम्स यांना नासाच्या फेडरल एम्प्लॉईज रिटायरमेंट सिस्टिम अंतर्गत पेन्शन मिळणार आहे. ही पेन्शन त्यांचा एकूण सेवा कालावधी आणि सरासरी वेतनाच्या आधारावर निश्चित केली जाईल. त्याशिवाय त्यांना अमेरिकेच्या सोशल सिक्युरिटी स्कीमचा फायदाही मिळणार आहे. त्यामधून त्यांना दरमहा एक निश्चित वेतन मिळत राहील.
अवश्य वाचा: ‘रुबाब’च्या डॅशिंग लव्हस्टोरीचा ट्रेलर प्रदर्शित, तरुणाईच्या स्वॅगदार प्रेमाची ठसकेबाज झलक
सुनीता विल्यम्स या पहिल्यांदा डिसेंबर २००६ मध्ये अंतराळात गेल्या. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा अंतराळाकडे उड्डाण केलं होतं. तर २०२४ मध्ये त्या बोईल स्टारलायनर मोहिमेच्या माध्यमातून त्या अंतराळात गेल्या होत्या. या मोहिमेवेळी काही तांत्रिक अडथळ्यांमुळे त्यांचं अंतराळातील वास्तव्य वाढलं होतं. अखेरीस २०२५ मध्ये त्या पृथ्वीवर परतल्या होत्या.



