SRH vs RR : सनरायजर्स हैदराबादची फायनलमध्ये धडक;राजस्थानला हरवले

हैदराबादच्या फिरकी गोलंदाजाच्या जाळ्यात राजस्थानचे फलंदाज अडकल्याने राजस्थानला हार मानावी लागली.

0
SRH vs RR
SRH vs RR

नगर : सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) राजस्थानवर ३६ धावांनी विजय मिळवत दणक्यात फायनलमध्ये धडक मारली आहे. आता २६ मे २०२४ रोजी चेन्नईच्या चेपॉकवर कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Night Riders) आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये चषकासाठी भिडत होणार आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना १७५ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी राजस्थानला १३९ धावांपर्यंतच रोखलं. हैदराबादच्या फिरकी गोलंदाजाच्या जाळ्यात राजस्थानचे फलंदाज अडकल्याने राजस्थानला हार मानावी लागली.

नक्की वाचा : झाडे लावण्याचा संदेश देणाऱ्या ‘झाड’ चित्रपटाचा टीजर प्रदर्शित

राजस्थानची खेळी खराब  (SRH vs RR)

हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना हेनरिक क्लासेन याच्या अर्धशतकाच्या जोरावर १७५ धावांपर्यंत मजल मारली होती. १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. टोम कोडमोर फक्त १० धावांवर बाद झाला. त्याने त्यासाठी १६ चेंडू खर्च केले. संजू सॅमसन यानेही ११ चेंडूत फक्त १० धावाच केल्या. पॅट कमिन्स याने कोडमोर याला बाद केले, तर अभिषेक शर्माने संजूचा अडथळा दूर केला. रियान पराग यावेळी अपयशी ठरला. रियान पराग १० चेंडूत ६ धावा काढून बाद झाला.

अवश्य वाचा : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणुकांची घोषणा;२६ जूनला होणार मतदान

यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुरेल यांची फटकेबाजी  (SRH vs RR)

राजस्थानची एका बाजूला विकेट पडत असताना यशस्वी जयस्वाल याची फटकेबाजी मात्र सुरुच होती. यशस्वीने २१ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. त्याने आपल्या वादळी खेळीत तीन षटकार आणि चार चौकार ठोकले. यशस्वी जायस्वाल आणि ध्रुव जुरेल यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला ३० धावसंख्या पार करता आली नाही. कोडमोर १०, संजू सॅमसन १०, रियान पराग ६, आर. अश्विन 0, शिमरोन हेटमायर ४, रोवमन पॉवेल ६ यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतरही ध्रुव जुरेल याने एकाकी झुंज दिली. जुरेल याने ३५ चेंडूत नाबाद ५६ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन षटकार आणि सात चौकार ठोकले. त्याला दुसऱ्या बाजूने हवी तशी साथ मिळाली नाही, त्यामुळे राजस्थानच पराभव झाला.

हैदराबादच्या फिरकी गोलंदाज शाहबाज अहमद याने आपल्या गोलंदाजीचा इम्पॅक्ट पाडला. त्याने ४ षटकामध्ये २३ धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत धाडले. अभिषेक शर्मा याने चार षटकात २४ धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. टी नटराजन आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here