Supriya Sule : मीरा-भाईंदरमध्ये (Mira bhayandar) उद्भवलेल्या परिस्थितीला सर्वस्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जबाबदार आहेत,अशी टीका राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अशावेळी गृहखातं काय करतं ? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेप्रमाणे एका सशक्त लोकशाहीत प्रत्येक भारतीयाला आंदोलन करायचा अधिकार दिला आहे. ही लोकशाही आहे दडपशाही नाही. असेही त्या म्हणाल्या.
नक्की वाचा : ‘मराठी माणसं आमच्या पैशावर जगतात’, निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
भारतीय जनता पक्षाला न शोभणार कल्चर आलं कुठून- सुप्रिया सुळे (Supriya Sule)
मीरा-भाईंदरमध्ये झालेल्या गोंधळाला फक्त आणि फक्त गृहखातं आणि मुख्यमंत्री जबाबदार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदा वेगळं आणि दुसऱ्यांदा वेगळच काहीतरी बोलतात. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. दुर्दैव आहे की मी समजत होते की, भाजप हा एक सुसंस्कृत राजकीय पक्ष आहे. मात्र दुर्दैवाने गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचं वागणं मग ते भाषा, प्रांत, वागणूक आणि ज्या धमक्या दिल्या जात आहे, हे ओरिजनल भारतीय जनता पक्षाला शोभणार नाही. हे न शोभणारं कल्चर भाजपमध्ये कुठून येत आहे ? हे लोकशाहीला शोभणारी बाब नाही, अशी टीकाही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
भाजपच याला जबाबदार- सुप्रिया सुळे (Supriya Sule)
या सगळ्या परिस्थितीला भाजप जबाबदार आहे. कारण अजित पवार म्हणतात, हिंदी सक्ती मी नाही केली. शिवसेना शिंदे गट म्हणतो की ही सक्ती आम्ही नाही केली. मग याला जबाबदार कोण तर भारतीय जनता पक्षानेच हिंदी सक्ती केली.आम्ही हिंदी किंवा कुठल्याच भाषेच्या विरोधात नाही. मात्र केवळ आमचं एवढंच म्हणणं आहे की कुठल्याही भाषेची सक्ती करू नका. असेही खासदार सुळे म्हणाल्या.