
Suresh Dhas :अहिल्यानगरमध्ये घडलेली अपघाताची घटना (Ahilyanagar Accident) ही चुकून घडली आहे. त्यामध्ये ड्रिंक आणि ड्राईव्हचा (Drink and Drive) कोणताही विषय नसल्याचं आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी म्हटलं आहे. आपल्या मुलाचे आणि ड्रायव्हरचे ब्लड सँपल घेतलं असून पोलिस त्याचा तपास करत असल्याची माहितीही धस यांनी दिली. हा अपघात झाल्यानंतर सागरने मला फोन केला होता. त्यावेळी तू तिथेच थांब, सगळं कायदेशीर झाले पाहिजे असं आपण त्याला सांगितलं असंही आमदार धस म्हणाले.
नक्की वाचा : गुजरातमध्ये पुलाचे अचानक २ तुकडे;अनेक वाहने नदीत कोसळली,३ जणांचा मृत्यू
आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाने सोमवारी (ता.७) कार चालवताना एका दुचाकीस्वाराला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नितीन शेळके असं मृत व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी सुपे पोलिस ठाण्यात आमदार धस यांचा मुलगा सागर धसविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या कारनाम्यामुळे आता सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
अवश्य वाचा : आलिया भट्टच्या पर्सनल असिस्टंटला अटक; बनावट सह्या करत ७७ लाखांची केली फसवणूक
नेमकं काय घडलं ? (Suresh Dhas)
आमदार सुरेश धस हे या प्रकरणाची माहिती देताना म्हणाले की,अहिल्यानगरमध्ये ही घटना घडली आहे. माझा मुलगा मुंबईला एका ट्रिटमेंटसाठी जात होता. त्यावेळी नितीन शेळके याची बाईक अचानक त्याच्या गाडीसमोर आली. त्यामुळे हा अपघात झाला. त्यानंतर माझ्या मुलाने आणि त्याच्या चुलत भावाने त्याला दवाखान्यात न्यायचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.
‘माझा मुलगा सुपारी सुद्धा खात नाही’ (Suresh Dhas)
धस पुढे म्हणाले की, माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही. त्यामुळे ड्रिंक आणि ड्राईव्ह प्रकरणाचा प्रश्नच येत नाही. या प्रकरणात कुणाचाही दबाव नाही. मी कुणालाही फोन केला नाही, तिथल्या पोलीस अधीक्षकांनाही फोन केला नाही. हा अपघात दुर्दैवानेच घडल्याचं सुरेश धस म्हणाले. या प्रकरणात अपघाताची जी काही कलमं असतात ती लावण्यात आली आहेत. पोलिसांनी त्यांचं काम केलं आहे अशी माहिती धस यांनी दिली.