Teachers Holidays Cancelled:शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर संक्रात? कारण नेमकं काय?

0
Teachers Holidays Cancelled:शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर संक्रात? कारण नेमकं काय?
Teachers Holidays Cancelled:शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर संक्रात? कारण नेमकं काय?

नगर : राज्यातील लाखो शिक्षकांसाठी यंदाचा उन्हाळा सुट्टीचा नाही, तर घामाचा ठरणार आहे! एकीकडे पारा ४० अंशांच्या पार जात असताना, दुसरीकडे शासनाने जनगणनेच्या (Census) राष्ट्रीय कामाचा हवाला देत शिक्षकांना सुट्टीतही कामावर हजर राहण्याचे (Teachers Holidays Cancelled) फर्मान सोडलं आहे, यामुळे शिक्षक संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता शिक्षकांना सुट्ट्या का नसतील ते जाणून घेऊ..

नक्की वाचा: आधुनिक हिरकणी! ६ महिन्याच्या चिमुरडीला घेऊन सर केला शिवनेरी किल्ला

जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती (Teachers Holidays Cancelled)

राज्यात २ मे ते १४ जूनदरम्यान शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागण्याची शक्यता आहे. मात्र, शिक्षकांना यंदा या सुट्ट्यांचा लाभ घेता येणार नाही. कारण सरकारने आगामी जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उन्हाळाच्या सुट्ट्यात शिक्षकांना जनगनणेची कामं करावी लागणार आहे. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये सध्या नाराजीचे वातावरण आहे. समोर आलेल्या माहितीनुसार,सर्व अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी जनगणनेचं काम अनिवार्य करण्यात आले आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षकांना सुट्यांच्या काळात मुख्यालय सोडू नये, असे आदेशही दिले आहेत. 

अवश्य वाचा: साखर सम्राटांची मनमानी! शेतकऱ्यांची ५१८ कोटी एफआरपी थकवली 

२०११ नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या जनगणनेअंतर्गत १६ मे ते १४ जून दरम्यान घरांची मोजणी व यादी तयार करण्याचे काम केले जाणार आहे. त्यापूर्वी एप्रिल अखेरपासून मे च्या सुरुवातीपर्यंत प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण होताच शिक्षकांना या प्रशिक्षणात सहभागी व्हावे लागेल. मात्र शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षकांचा पूर्ण हिरमोड झालाय. जुलैमध्ये टीईटी परीक्षा होण्याची शक्यता आहे. मात्र जनगणनेच्या कामामुळे या परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे. याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होण्याची भीतीही शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

जनगनणेचं काम करणाऱ्या शिक्षकांना विशेष रजा (Teachers Holidays Cancelled)

महत्त्वाचे म्हणजे सुट्यांमध्ये जनगनणेचं काम करणाऱ्या शिक्षकांना तेवढ्याच दिवसांची विशेष रजा दिली जाईल, असं सरकारने स्पष्ट केलं आहे. मात्र, यामुळे नव्या शैक्षणिक सत्राच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो, असे शिक्षकांचे मत आहे. घराघरांत जाऊन सर्वेक्षण करण्याच्या अटीमुळे विविध ठिकाणच्या दिव्यांग शिक्षक संघटनांनी मात्र या कामातून सूट देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदनेही सादर करण्यात आली आहेत. मात्र आता दिव्यांग शिक्षकांच्या बाबतीत सरकार नेमका काय निर्णय घेणार आणि इतर शिक्षकांची  नाराजगी सरकार घालवू शकेल का हेच आता बघावे लागणार आहे.