The Long March : अकोले: किसान सभा व सीटू कामगार संघटना यांच्यावतीने २४ फेब्रुवारी रोजी राजूर (ता. अकोले) येथून निघालेल्या लाॅंग मार्चची (The Long March) संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वर येथे आज (ता.२७) दुपारी यशस्वी सांगता झाली. अर्धवेळ परिचरांना दोन हजार रुपये व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये वेतनवाढ, भंडारदरा धरणाचे पाणी परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांना पिण्यासाठी व सिंचनासाठी शासकीय योजनेतून उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश, वन जमिनी व घरांच्या तळ जमिनी श्रमिकांच्या नावे करण्यासाठी झालेल्या राज्यस्तरीय निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी, बांधकाम कामगारांना शस्त्रक्रिये बरोबरच इतर सर्व आजारांसाठी कुटुंब मेडिक्लेम योजना मान्य करण्यात आल्याने लॉंग मार्चची यशस्वी सांगता करण्यात आली.
अवश्य वाचा- बचत गटांच्या माध्यमातून महिला उद्योजकांना हक्काचे व्यासपीठ; श्रीगोंदा यात्रेत खाद्य पदार्थांची रेलचेल
तीन दिवस ५८ किलोमीटरचा पायी प्रवास (The Long March)
तीन दिवस ५८ किलोमीटरचा पायी प्रवास करून हा लॉंग मार्च जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गावाच्या वेशीवर धडकला होता. यामध्ये आदिवासी शेतकरी, कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मंत्रालयामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके व विविध खात्याचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली होती. या बैठकीत काही प्रश्न अनिर्णित राहिले होते. वेतन वाढीसाठी आवश्यक असलेल्या आर्थिक तरतुदीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विषय मांडण्याची आवश्यकता होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेची आवश्यकता होती. त्यामुळे बैठकीनंतरही लॉंग मार्च सुरूच ठेवण्यात आला होता.
नक्की वाचा- नेमकं कोणाचा फोन आला? आमदार रोहित पवारांनी वेगळाच संशय व्यक्त केला
मंत्री विखे पाटील व भुसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद (The Long March)
पालकमंत्री विखे पाटील यांनी या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री भुसे यांच्याबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांची दुसऱ्या दिवशी भेट घेऊन याबाबतचा विषय उपस्थित केला. तसेच त्याच दिवशी सायंकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही हे विषय ठेवण्यात आले. यानुसार आर्थिक तरतूद करत अर्धवेळ परिचरांना दोन हजार रुपये व प्रस्तावातील अपूर्णता पूर्ण करून शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये वेतन वाढ जाहीर करण्यात आली. या निर्णयाची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर व अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी संघटनेला दिली. मंत्री विखे पाटील व भुसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित मोर्चेकरांशी संवाद साधला व शासनाने घेतलेल्या सर्व १८ निर्णयांची माहिती संघटनेला दिली. मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत वारंवार खात्री करून घेत अखेर लोणी गावाच्या सीमेवर असलेल्या निझर्णेश्वर मंदिर परिसरात लॉन्ग मार्च स्थगित करण्याची घोषणा केली. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नंदू डहाणे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, गणेश ताजणे, संगीता साळवे, हेमलता शेळके, तुळशीराम कातोरे, सुमन विरनक, राजाराम गंभीरे, ताराचंद विघे, मथुराबाई बर्डे आदींनी मेहनत घेतली.



